वराडसीमकरांनी जोपासली चारशे वर्षांची परंपरा : अडीच फुटांच्या खिडकीतून बैल बाहेर पडताच शेतकर्यांनी केला जल्लोष
आगळा-वेगळ्या पोळ्याची राज्यात महती : जोगलखोरीच्या शेतकर्याला मानाचे नारळ
Four hundred years of tradition cultivated by Varadsimkar : Farmers cheered as the bull came out of the two-and-a-half-foot window भुसावळ (3 सप्टेंबर 2024) : सुमारे चारशे वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे बैल पोळा सण अनोख्या पद्धत्तीने साजरा करण्यात आला. सोमवार, 2 सप्टेंबर रोजी पोळ्यानिमित्त सजवलेल्या बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढल्यानंतर अडीच बाय अडीच फूट आकाराच्या लहानशा खिडकीतून बैल कुदवून पोळा फोडण्यात आला. गजानन पाटील (जोगलखोरी) यांच्या बैलाने प्रथम तर दुसरा क्रमांक वराडसीमचे भास्कर पाटील यांच्या बैलाने तर तृतीय क्रमांक नामदेव पाटील यांच्या बैलाने मिळवला. यावेळी शेतकर्यांचा मानाचे नारळ देवून गौरव करण्यात आला.
खिडकीतून बैल कुदवण्याची परंपरा
वराडसीम येथील आगळा-वेगळा पोळा सण राज्यभरात प्रसिद्ध आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी नारायण राघो पाटील या राजपूत समाजाच्या व्यक्तीला अपत्य नसल्याने त्यांनी गावात आपले नाव रहावे या उद्देशाने त्या काळी अवघे पंचवीस रुपये खर्च करून गावाला एक मुख्य दरवाजा बांधून दिला. या दरवाजाला अडीच बाय-तीन आकाराची खिडकी लावण्यात आली. पूर्वी रात्री-अपरात्री येणार्याची शहानिशा केल्यावरच दरवाज्याच्या वर बांधलेल्या बंगल्यात असलेला रखवालदार त्या खिडकीतूनच संबंधिताला प्रवेश देत असत. कालांतराने या दरवाजाचा पोळा या सणासाठी वापर होऊ लागला.

मानाच्या बैलाची मिरवणूक
यंदा वराडसीम गावातील सुनील पाटील यांच्या बैलाला बाशिंग बांधण्याचा मान मिळाला. या बैलाची गावातून दुपारी एक वाजेच्या सुमारास मिरवणूक काढण्यात आली व पावणेतीन वाजेच्या सुमारास या बैलाला खिडकीतून बाहेर काढल्यानंतर दरवाजा लावून घेण्यात आला. त्यानंतर गावातील सर्व बैलांना एकत्र आणून दरवाजाच्या खिडकीजवळ आणण्यात आले. तीन वाजता खिडकी उघडताच सुरूवातीला जोगलखोरीच्या गजानन पाटील यांचा बैल बाहेर पडला व त्यानंतर वराडसीमचे भास्कर पाटील व नामदेव पाटील यांचे बैल अनुक्रमे बाहेर पडल्याने तिघाही शेतकर्यांना मानाचे नारळ देवून गौरवण्यात आले. खिडकीतून बैल कुदताच शेतकर्यांनी मोठा जल्लोष केला.
