दसनूरला आज उमेश्वर महादेव यात्रोत्सव : बारागाड्या ओढल्या जाणार!
सिंगनूर, ता.रावेर (3 सप्टेंबर 2024) : येथून जवळच असलेल्या दसनूर येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या उमेश्वर महादेवांचा यात्रोत्सव पोळ्याच्या पाडव्याला मंगळवार, 3 रोजी साजरा होणार आहे. यात्रेनिमित्ताने मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळी बारागाडया ओढण्यात येतील. गावाच्या यात्रोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. यात्रेवेळी गावोगावीचे लोक उमेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी येऊन आपल्या मनातील इच्छा बोलतात व ती पूर्णही होते, अशी भाविकांची मोठी श्रद्धा आहे.
मंगळवार, 3 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेला भगत बाळू कोळी बारागाड्या ओढतील. त्यांना बगले म्हणून प्रभाकर कोळी, दीपक चौधरी हे साथ देतील. यात्रोत्सवानिमित्त खेळणी तसेच विविध व्यावसायीकांनी संसारोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली आहेत. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी सरपंच मयूर महाजन, पोलीस पाटील दीपक पाटील, तुकाराम महाजन, महेश चौधरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

