राज्यसभेत नव्हे तर विधानसभेत होती रूची -माजी मंत्री एकनाथराव खडसे
मुक्ताईनगर : राज्यसभेच्या निवडणुकीत मुळातच आपल्याला रूची नव्हती मात्र विधानसभेसाठी आपण इच्छूक होतो, असा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे. राज्यसभेसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोंसले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिसरा उमेदवार म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे, संजय काकडे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार? अशी चर्चा रंगत होती मात्र दोघांपैकी एकालाही संधी न देता भाजपने मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, एक व्यक्ती, एक पद या धोरणानुसार खासदार रक्षा खडसे यांना आधीच पद मिळाले आहे त्यामुळे दुसर्यांदा पद देण्याचा प्रश्न नाही शिवाय आपणदेखील राज्य सभेसाठी इच्छूक नव्हतो मात्र विधानपरीषदेसाठी आपण इच्छूक असल्याचे ते म्हणाले. पक्षावर नाराजीचा प्रश्नच नसल्याचेही त्यांनी सांगितले.
