एकदा बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे ; बारामतीतून विधानसभा निवडणूक न लढण्याचे अजितदादा पवारांचे संकेत
Ajitdada Pawar’s indication of not contesting assembly elections from Baramati पुणे (9 सप्टेंबर 2024) : दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलून दाखवली. अजितदादांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ ते बारामतीतून निवडणूक लढणार नसल्याचे संकेत असल्याचे राजकीय समीक्षकांना वाटत आहे तर अजित पवार भावनिक राजकारण करत आहेत, अशी टीका विरोधकांकडून होत आहे.
वेगळी भूमिकेनंतरही झाला पराभव
अजित पवार म्हणाले, एकदा बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. मग त्या वेळी माझी 1991 ते 2024 पर्यंतच्या कामाची तुलना करा. त्या वेळी 1991 पासूनची माझी कामे तुम्हाला कळतील. मीही आता 65 वर्षांचा झालो. बारामतीत मी वेगळी भूमिका घेतली नाही तरीही पराभव झाला. बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला म्हणजे तुम्हाला माझी किंमत कळेल. मी केलेली कामे तुम्हाला कळतील. आम्ही सकाळी लवकर उठतो त्यावर आमची काहीजण चेष्टा करतात. त्यात माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही. मुस्लिम समाजाने मला काही निवेदन दिले तर काही जण वेगळे वक्तव्य करतात. मी फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार सोडणार नाही. बारामतीत काम करत असताना एका समाजाने सांगावं की आमच्यावर अन्याय झाला. कार्यकर्ता कसा सक्षम होईल आपण बघितले पाहिजे.

शरद पवारांमुळेच बारामती उभी राहिली
अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शरद पवार हे उच्च पदस्थ राजकारणी असल्याने कोणी पंतप्रधान असो, कुठलाही मंत्री असो ते सगळे साहेबांच्या संबंधापोटी बारामतीत व्यवस्थित लक्ष देत होते. त्यांना (अजित पवार) असे वाटत असेल की त्यांच्यामुळे बारामती उभी राहिली तर हा त्यांचा गैरसमज आहे. बारामती खरी उभी राहिली ती पवार साहेबांमुळे. अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या हाताखालीच काम करावे लागते, वडीलधार्या माणसाचे अपमान करणे, पाडून बोलणे, वडीलधार्या माणसांची मृत्यूची इच्छा व्यक्त करणे हे लोकांना आवडले नाही, पटत नाही. अजित पवार काम करत नाही का? काम करतात. मात्र, काकांना बाहेर काढावे हे लोकांना आवडले नाही, असेही आव्हाड म्हणाले.




