महाराष्ट्रात बुवाबाजीविरोधात कठोर कारवाईची हवी : भुसावळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन
भुसावळ (सोमवार, 20 जुलै 2026) : महाराष्ट्रात बुवाबाजी व अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ताईनगर शाखेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन प्रांताधिकारी तथा तहसीलदार, भुसावळ यांच्यामार्फत पाठविण्यात आले. भुसावळ शहर पोलीस ठाण्यासमोर सोमवारी लाक्षणिक आंदोलनही करण्यात आले.
आर्थिक व मानसिक फसवणूक
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात विविध ठिकाणी बुवाबाजीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक होत असून अनेक तथाकथित बुवा अंधश्रद्धेचा आधार घेत लोकांची दिशाभूल करत आहेत. अशा प्रकारांमुळे समाजात चुकीच्या प्रवृत्तींना खतपाणी मिळत असून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर बुवाबाजीच्या नावाखाली फसवणूक करणार्या व्यक्तींवर पोलीस यंत्रणेमार्फत तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनीही कोणत्याही चमत्कार, अंधश्रद्धा किंवा भोंदूगिरीच्या आहारी न जाता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा आणि अशा प्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन समितीच्या पदाधिकार्यांनी केले आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष सुभाष तथा रविंद्र अहिरे, शाखाध्यक्ष डॉ. सुभाष लोखंडे, बुवाबाजी संघर्ष विभागाचे अरुण नामदेव यांच्यासह समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.



