महिलांच्या सक्षमीकरणासाठी भुसावळात 26 ते 28 दरम्यान महिला उद्योजक मेळावा : रजनी सावकारे
भुसावळ (24 ऑक्टोबर 2024) : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदा सुध्दा 26 ते 28 ऑक्टोबर या काळात महिला सक्षमीकरणासाठी तीन दिवस महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन शहरातील ब्राम्हण संघात करण्यात आले आहे. शहरवासीयांनी या मेळाव्याला भेट द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी सावकारे यांनी पत्रकार परिषदेत केले.
पुढील वर्षी पाच दिवसीय मेळावा
रजनी सावकारे म्हणाल्या की, गेल्या 12 वर्षापासून महिला सक्षमीकरणासाठी महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे केले जात आहे. यात शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी स्वत: तयार केलेल्या वस्तू, आकाश कंदीलपासून ते डेकोरेशनचे साहित्य, साड्या, घर सजावटीच्या वस्तू, खान्देशी पदार्थ, दिवाळीचे फराळाचे साहित्य या मेळाव्यात ठेवलेले असते. या मेळाव्यात स्टॉल लावण्यार्या महिलांना मोफत स्टॉल लावता येतात. यामुळे गेल्या 12 वर्षांपासून या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असतो. यामुळे महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळत असते. ग्रामीण भागातील महिलांना या माध्यमातून दोन पैसे मिळून त्यांची सुध्दा दिवाळी आनंदात जात असते, असेही म्हणाल्या पुढच्या वर्षी 4 अथवा 5 दिवसाचा हा मेळावा ठेवला जाईल, असे रजनी सावकारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.





