वरणगाव सेंट्रल बँक गोळीबार प्रकरण : सुरक्षा रक्षकाची जामिनावर सुटका
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाकडून बारा बोअरच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने तीन महिलांसह एक पुरूष जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या प्रकरणी सुरक्षा रक्षक लालचंद जनार्दन चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. बुधवारी त्यांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.
गोळीची रीकामी पुंगळी जप्त
वरणगाव शहरातील महामार्गावरील सेंट्रल बँकेत मंगळवारी सुरक्षा रक्षक लालचंद जनार्दन चौधरी (55, तापी नगर, भुसावळ) हे नेहमीप्रमाणे बँकेच्या मुख्य व्दाराजवळ बसले असताना खांद्यावरून बंदूक खाली सरकल्याने जमिनीवर पडलीव ही बंदूक उचलताना ट्रीगरवर हात दाबला गेल्याने एक गोळी बाहेर पडून ती शेजारी बसलेल्या तीन महिलांसह एक पुरुषाला लागून ते जखमी झाले होते. वरणगाव पोलिसात हत्यार निष्काळजीमुळे वापरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मंगळवारी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे बँक उघडल्यानंतर कामकाज सुरू होते परंतु या घटनेचा व्यवहारावर परीणाम झाल्याचे दिसून आले. बुधवारी रात्री उशिरा जळगाव येथील फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचार्यांनी संपूर्ण घटनास्थळाची काळजीपूर्वक पाहणी करून उडालेल्या गोळीची पुंगळी ताब्यात घेण्यात आली.