भुसावळातील हंबर्डीकर चाळ भागात धाडसी चोरी : साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास
Bold theft in Hambardikar Chawl area of Bhusawal: Property worth Rs. 5.5 lakhs looted भुसावळ (28 नोव्हेंबर 2024) : शहर पोलीस ठाणे हद्दीतील हंबर्डीकर चाळ परिसरातील वयोवृद्धाच्या घरातून चोरट्यांनी पाच लाख 57 हजारांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घरफोडीची घटना शुक्रवार, 8 ते शनिवार, 9 नोव्हेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी मंगळवारी 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
भुसावळ शहरातील हंबर्डीकर चाळ परिसरातील हॉटेल घासीलाल मागे अरुण दोधू चौधरी (68) हे कुटुंबासह वास्तव्याला आहे. 8 रोजी दुपारी 12.30 ते 9 रोजीच्या सायंकाळी साडेपाच दरम्यान चोरट्यांनी केव्हातरी संधी साधत घराच्या कपाटातून पाच लाख 57 हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी सर्वत्र मुद्देमालाचा शोध घेतला मात्र काहीही तपास न लागल्याने त्यांनी शहर पोलिसात धाव घेतल्यानंतर 26 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शाखाली सहा.पोलीस निरीक्षक राहुल भंडारे हे करीत आहे.
पाच लाख 57 हजारांचा मुद्देमाल
चोरट्यांनी घराच्या कपाटातील दोन लाख 20 हजारांची रोकड, 20 ग्रॅम वजनाचा व 68 हजार रुपये किंमतीचा चपला हार, 20 ग्रॅम वजनाच्या व 68 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 15 ग्रॅम वजनाच्या व 51 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, 30 हजार रुपये किंमतीची 9 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 10 ग्रॅम वजनाची व 34 हजार रुपये किंमतीची शॉर्ट चैन, पाच हजार रुपये किंमतीची कर्णफुले, 17 हजार रुपये किंमतीची कर्णफुलांची साखळी, 34 हजार रुपये किंमतीची सोन्याची जुनी चैन, 30 हजार रुपये किंमतीची बदामी अंगठी असा एकूण पाच लाख 57 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला.