भुसावळात टेन्ट हाऊसच्या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान

शॉर्ट सर्किटने आगीचा अंदाज : तीन तासानंतर आगीवर नियंत्रण


Loss worth crores of rupees in tent house fire in Bhusawal भुसावळ (29 नोव्हेंबर 2024) : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील राजस्थान मार्बलपासून काही अंतरावरील कला नगराजवळ दिनेश टेंट हाऊसच्या गोदामाला बुधवार, 27 रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास आग लागली होती. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर गोदाम परिसरातील रहिवासी धास्तावून त्यांनी सुरक्षितजागी आश्रय घेतला होता तर तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळाले होते. आगीचे ठोस कारण समोर आले नसलेतरी चार्जर पॉईंटमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळाल्याचे सांगण्यात आले.

आगीत गोदाम खाक : शॉर्ट सर्किटने आगीचा अंदाज
भुसावळात कुशल राणे व सुशील राणे हे भावंडे गेल्या 50 वर्षांपासून टेंन्ट व्यावसायीक म्हणून काम करतात. राष्ट्रीय महामार्गावरील राजस्थान मार्बलजवळ त्यांचे दिनेश टेंट हाऊस म्हणून प्रशस्त गोदाम आहे. या गोदामात बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजता आग लागली. पाहता-पाहता गादी, चादरी व अन्य जळावू साहित्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला तर उंचावर निघणार्‍या ज्वाला पाहून गोदामालगतचे रहिवासी धास्तावले. त्यांनी अप्रिय घटनेच्या वाहनेही सुरक्षित जागी लावत स्वतःदेखील आश्रय घेतला. आगीचे ठोस कारण समजू शकले नसलेतरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे.

भुसावळ पालिकेसह दीपनगरचा बंब दाखल
आगीची माहिती कळताच दीपनगर प्रशासनाचा बंबाला पाचारण करण्यात आले तर भुसावळ अग्निशमन दल आरओएचमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी गेल्यानंतर त्यांना आगीची माहिती कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिका अग्निशमन अधिकारी महेश माकोडे व त्यांच्या सहकार्‍यांद्वारे दहावर बंबांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच होते तर भुसावळचे माजी नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या टँकरने देखील आग विझवण्यासाठी चार ते पाच फेर्‍या केल्याचे सांगण्यात आले. भुसावळचे माजी नगरसेवक व साईसेवक पिंटू कोठारी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, निकी बत्रा व तरुणांनी देखील आग विझवण्यासाठी धडपड केली.

कोट्यवधी रुपयांचे नुकसान
या आगीत गोदामातील मोठ्या प्रमाणातील मंडप, कनात, बांबू, गाद्या, बेडशीट, चादरी, सजावटीचे साहित्य, टाक्या, पत्रे यासह लग्न मंडपासाठी लागणारे महागडे साहित्य खाक झाले. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

आगीमुळे महामार्ग ठप्प : पोलिसांची धाव
राष्ट्रीय महामार्गालगतच लागलेल्या आगीमुळे शहरातील नागरिकांची तसेच रस्त्यावरील वाहनधारकांची आग पाहण्यासाठी गर्दी झाल्याने काही वेळेसाठी महागार्ग ठप्प झाला होता. शहर वाहतूक शाखेसह बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. भुसावळ तहसीलदार निता लबडे यांनीदेखील प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांसह धाव घेत आगीची पाहणी करीत तलाठ्यांना पंचनाम्याच्या सूचना केल्या.

गोदामातील आग पाहता मालक बेशुद्ध
कोट्यवधी रुपयांचे साहित्य असलेल्या टेन्ट हाऊसला लागलेली आग पाहून घटनास्थळी आलेले टेन्ट व्यावसायीक कुशल राणे जागीच भोवळ आल्याने बेशुद्ध झाले. यावेळी तरुणांनी त्यांना रुग्णालयात हलवले तर त्यांचे बंधू सुशील राणे यांनी मन हेलावणारा आक्रोश केला.


कॉपी करू नका.