हतनूर जलाशयाला ‘रामसर स्थळ’ दर्जा घोषित करा
राज्यमंत्री रक्षा खडसे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मागणी
Declaring Hatnur Reservoir as a ‘Ramsar Site’ भुसावळ (1 डिसेंबर 2024) : भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण आणि त्याच्या आसपासचा परिसर त्याच्या अपवादात्मक जैवविविधतेसाठी, विशेषतः अनेक स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी प्रजातींच्या अधिवास म्हणून ओळखला जातो. याची समृद्ध पक्षी विविधतेमुळे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वेटलैंड इंटरनॅशनल यांनी त्याला महत्त्वपूर्ण पक्षी जैवविविधता क्षेत्र म्हणून मान्यता दिली आहे. या प्रदेशाला महत्वपूर्ण मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांच्या जवळीकतेमुळे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वदेखील आहे. हतनूर धरण जलसंधारण तलाव परिसराला ‘रामसर कन्व्हेन्शन’ अंतर्गत ‘रामसर स्थळ’* म्हणून घोषित करावे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे नवी दिल्ली येथे भेटीदरम्यान केली.
विविध प्रजातील पक्षांचा रहिवास
हतनूर धरण जलसंधारण तलाव परिसरात ‘तलवार बदक’, ‘थापट्या बदक’, ‘चिखलपायटे’, ‘करकोचे’, विविध प्रकारचे ‘कुदळे’ पक्षी मोठ्या संख्येने दिसतात. विशेषत्वाने एप्रिल-मे महिन्यादरम्यान या परिसरात ‘फ्लेमिंगो’ पक्ष्यांचे आगमन होते. त्यासोबत ‘स्पूनबिल’ (चमचा), ‘वेस्टर्न रीफ इग्रेट’, दुर्मीळ झालेला ‘मलार्ड’ हे पक्षी दक्षिणेकडून परतीच्या प्रवासाला निघालेले असताना हतनूर जलाशयावर काही दिवस निश्चितपणे थांबतात. याशिवाय जलाशय परिसरात पक्ष्यांच्या विविध प्रजाती प्रजननासाठी देखील येतात.

‘रामसर स्थळ’ दर्जा घोषित करा
हतनूर धरण जलसंधारण तलाव परिसराचे पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेता केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन हतनूर धरण जलसंधारण तलाव परिसराला ‘रामसर कन्व्हेन्शन’ अंतर्गत ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली. मागणीची पूर्तता झाल्यास केवळ संरक्षण प्रयत्नांना चालना मिळेल, असे नाही तर पर्यटन सुद्धा वाढेल तसेच स्थानिक रोजगारच्या संधी निर्माण होतील व स्थानिक समुदायांच्या आकांक्षा पूर्तीसाठी मदत होणार आहे.

