भुसावळात हबीबगंज एक्स्प्रेसमध्ये महिलेची चैन लांबवली : आरोपीला दोन वर्ष शिक्षा
Woman’s chain was pulled in Habibganj Express in Bhusawal : Accused sentenced to two years भुसावळ (4 डिसेंबर 2024) : 12154 हबीबगंज एक्सप्रेसने प्रवास करीत असलेल्या महिलेची 25 ग्रॅम सोन्याची चैन जबरीने चोरी केल्याप्रकरणी आरोपी राजकुमार उर्फ साधु कडू दौडे (32, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, नेपानगर, मध्यप्रदेश) यास भुसावळ रेल्वे न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवार, 3 रोजी सुनावली.
असे आहे चोरी प्रकरण
11 मे 2019 रोजी तक्रारदार महिला अन्नु सुरेंद्र हरजान या ट्रेन नं. 12154 हबीबगंज एक्सप्रेसने भोपाळ ते मुंबई असा आरक्षीत डब्यातून प्रवास करीत होत्या. भुसावळ रेल्वे स्टेशनवरून गाडी सुटल्यानंतर एक वाजेच्या सुमारास आरोपीने आऊटरजवळ फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरीने हिसकावून पलायन केले.रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी निष्पन्न करण्यात आल्यानंतर त्याच्याविरोधात भुसावळ रेल्वे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. भुसावळ रेल्वे न्यायालयात न्या.व्ही.बी.साळुंखे यांच्या न्यायासनासमोर या खटल्याचे कामकाज चालले. सरकारी अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील अॅड.नितीन खरे यांनी फिर्यादी, पंच शेख रियाज, पोलीस साक्षीदार सुधीर पाटील, तपासी अंमलदार पीएसआय अनिल केरूरकर असे चार साक्षीदार तपासले. आरोपीचे निवेदन व जप्ती पंचनामा यावरील पंचांची माक्ष महत्वपूर्ण ठरली.
सरकारी वकील नितीन खरे यांचा युकीवाद न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपीला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील खरे यांना पैरवी अधिकारी गणेश शिरसाठ यांचे सहकार्य लाभले.