जळगावात हळदीच्या कार्यक्रमात गावठी पिस्टल काढणार्या पुण्यातील तरुणाला बदडले
जळगाव (25 डिसेंबर 2024) : शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरात राजाराम हॉलमध्ये आयोजित हळदीच्या कार्यक्रमात एक तरुण बंदूक घेऊन दहशत माजवू लागताच नागरिकांमध्ये भीती पसरली. यावेळी तरुणाला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला.
पुण्यातील संशयीताला बेड्या
शहर पोलीस ठाण्याचे पथक 22 डिसेंबर रोजी रात्री गस्तीवर असताना राजाराम नगर मंगल कार्यालयाबाहेर वाद सुरू होता. शहर पोलीस ठाण्याचे उमेश भांडारकर आणि वसीम मलिक पोहोचल्यानंतर त्यांनी मारहाण होत असलेल्या तरुणाला सोडवले. पोलिसांनी विचारणा केल्यावर संशयीताने अतुल बजरंग तांबे (31, राजगुरू नगर, जि.पुणे) असे नाव सांगितले. नागरिकांनी माहिती दिली की, अतुल तांबे याच्यासोबत आणखी दोन जण होते.

पोलिसांना अतुल तांबे याच्या बॅगेत गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. त्याने पळून गेलेल्या एकाचे नाव माया तर दुसर्याचे नाव त्याला माहीत नसल्याचे सांगितले. शहर पोलीस ठाण्यात हवालदार उमेश भांडारकर यांच्या फिर्यादीवरून अतुल तांबे, माया व अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास एपीआय शीतलकुमार नाईक करीत आहेत.

