सावखेडासीम-गायरान दरम्यान रस्त्यावर दुचाकी घसरून पिता-पुत्र गंभीर
यावल (27 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील सावखेडासीम येथून गायरान जाणार्या रस्त्यावरून गुरूवारी दुचाकीद्वारे पिता-पुत्र येत असताना दुचाकी घसरल्याने 40 वर्षीय पिता व त्यांचा चार वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर दोघांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णाल हलवण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर आहे.
दुचाकी घसरल्याने अपघात
सावखेडासीम, ता.यावल येथून गायरान जाणार्या रस्त्यावर गायरानकडून सावखेडासीमकडे दुचाकीद्वारे राकेश भारत बारेला (40, रा.आशिरगडा ता.बर्हारपूर) हे मुलगा ईश्वर बारेला (4) हे दोघे येत होते. यावेळी भरधाव दुचाकी घसरल्याने चार वर्षीय बालकाच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि तो बेशुद्ध पडला तर राकेश बारेला यांनादेखील जबर दुखापत झाली. जखमी दोघांना नागरिकांच्या मदतीने सावखेडासीम येथील रुग्णवाहिकेद्वारे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.शुभम, अधिपरिचारीका ज्योत्ना निंबाळकर, बापू महाजन, पिंटू बागुल यांनी प्रथमोपचार केले.

दोघांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना यावल येथून तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.









