महाशिवरात्री यात्रोत्सव 2025 : आमदारांच्या हस्ते ध्वजपूजन


मुक्ताईनगर (24 फेब्रुवारी 2025) : आदिशक्ती मुक्ताई व योगीराज चांगदेव महाराज या गुरूशिष्य भेटीच्या पर्वावर माघवारी महाशिवरात्र यात्रोत्सवाचे ध्वजपूजन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. माघ महिन्यात महाशिवरात्री पर्वावर गुरू संत मुक्ताबाई व शिष्य चांगदेव महाराज यांच्या अनुग्रह दिनाच्या पर्वावर परंपरेने शेकडो दिंड्या पालख्यासह लाखो वारकरी वारीस येतात. मुक्ताबाई समाधीस्थळी मूळ मंदिर कोथळी येथे यात्रोत्सवाचे ध्वजपूजन उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी तहसीलदार गिरीश वखारे, संत मुक्ताई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील, विश्वस्त सम्राट पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख हभपरवींद्र महाराज हरणे, मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे हभप पंकज महाराज पाटील, छोटू भोई, पंकज राणे, पंकज कोळी, गणेश टोंगे, ज्ञानेश्वर हरणे, गणेश आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

*पहिल्यांदाच यात्रोत्सवाचे सुक्ष्म नियोजन
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चांगदेव मुक्ताई यात्रेकरिता उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांची इन्सीडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी 11 विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी व मंदिर विश्वस्त व्यवस्थापक यांनी करावयाच्या कामाची जबाबदारी दिली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सुक्ष्म नियोजनातून यावर्षीचा यात्रोत्सव पार पडत आहे.

एसडीआरएफचे जवान तैनात
जुने मुक्ताई मंदिर कोथळी व चांगदेव मंदिर येथे एसडीआरएफचे पथक 37 जवानांसह प्रथमच दाखल झाले. अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका सज्ज आहे.
गतवर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते यात्रोत्सवाचे ध्वज पूजन झाले. यंदाच्या यात्रोत्सवाचे नियोजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्हा प्रशासनाने आपल्या हातात घेतल्याने विविध सुविधा तसेच सुरक्षित यात्रोत्सव पार पडणार असल्याने वारकरी व भाविकांतर्फे समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यासह राज्यातून भाविक दाखल
संत मुक्ताई-चांगदेव विजया एकादशी व महाशिवरात्री माघवारी यात्रोत्सव 22 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2025 या काळात पार पडत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ही भूमी संत मुक्ताई साहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी त्यातच चांगदेव येथे योगीराज चांगदेव महाराज यांची तपोभूमी असल्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यातून वारकरी व भाविक मोठ्या संख्येने पायी दिंडी सोहळे तसेच दळण-वळणाच्या अनेक साधनांनी दर्शनासाठी तसेच भक्तीचा जागर करण्यासाठी मुक्ताई चरणी लीन होण्यासाठी दाखल होत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !