मृत्यूनंतरही तुमचे डोळे पाहतील जग : डॉ.नि.तु.पाटील

बोदवड (26 फेब्रुवारी 2025) : समाजामध्ये अजूनही नेत्रदानाबद्दल पुरेशी जागरूकता निश्चितपणे नाही. युवकांनी मनावर घेतले तर नक्कीच समाजात सकारात्मक बदल घडेल. नेत्रदान केल्यास मृत्यू नंतरही तुम्हाला सुंदर जग पाहता येईल व अंध व्यक्तींना नेत्रदानामार्फत निसर्गाचा आनंद घेता येईल, असे प्रतिपादन आज डॉ.नि.तु.पाटील यांनी बोदवड येथे केले.
परमवीर चक्र विजेता कॅप्टन विक्रम बत्रा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नेत्रदान आणि त्याचे महत्त्व याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी वासुदेव नेत्रालय वरणगावचे संचालक डॉ.नि.तु.पाटील यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला. नेत्रदान म्हणजे काय? नेत्रदान कोण करू शकतो? कोण नाही? शासकीय अटी नियम? नेत्रदानाची प्रक्रिया? आदी आदींविषयी सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थी मित्रांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरेदेखील देण्यात आली.
यावेळी गटनिर्देशक अनिल कोल्हे, विजेंद्र कोळेकर, शिल्प निर्देशक गिरीश राणे, विजय सोनवणे, सागर वाघ, दीपक चौधरी, संतोष आमोदेकर, प्रनोती चव्हाण, पूजा डोंगरे, व्ही.पी. भालेराव, चरणजीत उज्जैनवाल आदी उपस्थित होते. यावेळी अनिल कोल्हे यांनी प्रस्तावना तर विजेंद्र कोळेकर यांनी आभार मानले.
