बचत गटाच्या महिलांची फसवणूक : दोषींवर कारवाईसाठी महिला आक्रमक
अजनाडच्या महिलांचे रावेर पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

रावेर (4 मार्च 2025) : रावेर तालुक्यातील अजनाड येथील बचत गटाच्या महिलांनी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून विविध वित्तीय खाजगी संस्थांकडून सुमारे तीन कोटीहून अधिक कर्ज घेतले मात्र ही रक्कम भरण्यात आली नाही व फसवणूक करण्यात आली. बचत गटाच्या महिलांची फसवणूक करणार्या बचत गटाच्या सीआरपी यांच्याविरुद्ध चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न उपस्थित करून बचत गटांच्या महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.
अशी झाली फसवणूक
अजनाड येथील सुमारे दहा ते पंधरा महिला बचत गटाच्या महिलांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा, खानापूर, एचडीबी फायनान्स, नम्र फायनान्स, अॅक्सिस बँक तसेच इतर फायनान्स कंपन्यांकडून बचत गट स्थापन करून कर्ज घेतले आहे. बचत गटांचे कर्ज मंजूर करण्यासाठी व कर्ज भरणा करण्यासाठी सीआरपी रुपाली मुकेश तायडे (अजनाड) यांची नेमणूक करण्यात आली. रुपाली तायडे यांनी कर्ज रक्कम बचत गटाकडून स्वीकारून फायनान्स कंपनीकडे जमा करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी कर्जाची रक्कम भरलीच नाही. गेल्या पंधरा दिवसापासून कर्जाची रक्कम जमा होत नसल्यामुळे फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी यांनी अजनाड येथे जाऊन बचत गटाच्या महिलांना ही बाब लक्षात आणून दिली. अजनाड येथील बचत गटाच्या महिलांची कर्जाची सुमारे तीन कोटी रुपयांचा अपहार रुपाली तायडे यांनी केल्याचा आरोप महिलांनी यावेळी केला. या प्रकाराची सखोल चौकशी करून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशा मागणी पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनावर यांच्या सह्या
निवेदनावर वैशाली भोई, आशा कोळी, ज्योती कोळी, रेखा भोई, सरस्वती भोई, सुमन कोळी, प्रतिभा पाटील, अर्चना चौधरी, शीतल कोळी, सरला चौधरी, पूजा कोळी, उषा कोळी, शारदा कोळी, दीपाली धनगर, वंदना धनगर यांच्यासह अनेक महिलांच्या सह्या आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील उपस्थित होते.
फायनान्स कंपनी सोबत बैठक
रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार बी.ए.कापसे, निवासी तहसीलदार संजय तायडे, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्यासह विविध फायनान्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, महिला बचत गटाच्या महिलांच्या उपस्थितीत बैठक झाली. रुपपाली तायडे या महिलेने फसवणूक केल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात करण्याच निर्णय घेण्यात आला.