नाथाभाऊंचा मोठा दावा : आपल्याला अजित पवार गटात येण्याचा निरोप !

Nathabhau’s big claim: We are told to join Ajit Pawar’s group! जळगाव (14 मे 2025) : अजित पवारांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकीकडे विलीनीकरण होत असल्याच्या चर्चा राज्यात जोर धरत असताना जळगाव जिल्ह्यातील हेवीवेट नेते आमदार एकनाथराव खडसे यांनीदेखील आपल्याला अजित पवार गटात येण्यासाठी निरोप मिळाल्याचा दावा केला आहे.
राज्यातील महायुतीमधील अजित पवारांच्या पक्षात अनेक नेत्यांसह कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत असतांना आता जळगावमधील शरद पवार गटातील नेते अजित पवार गटात जाणार असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांवर खुद्द एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडली आहे. आपण अजित पवार यांच्या गटात जाणार नाही आणि आपली राजकीय निष्ठा शरद पवार यांच्याशीच जोडलेली राहील, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या एकनाथ खडसेंच्या अजित पवार गटातील प्रवेशाच्या चर्चा अखेर संपुष्टात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी जळगावातील शरद पवार गटातील माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश केला. यामुळे जळगावात शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यानंतरही जळगावातील अनेक नेतेमंडळी अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अजित दादांच्या गटामध्ये जळगावातील काही नेते मंडळी गेली. ज्या लोकांना जायचे होते ते गेले, ज्यांना नाही जायचे ते आमच्या सोबत राहिले आहेत. यानंतर आता आणखी काही नेते अजित पवार गटात जातील, असे मला वाटत नाही. आम्ही आता शरद पवार साहेबांसोबत आहोत, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
ज्यावेळेस अजित दादा पवार यांचा गट वेगळा झाला, त्याच वेळी ज्यांना जायचे होते ते सर्व आमदार अजितदादा गटात सामील झाले. त्या कालखंडात मला देखील निरोप देण्यात आला होता की, तुम्ही अजितदादा पवार गटात या. परंतु, त्यावेळेस देखील मी अजित पवार गटात गेलो नाही. मी शरद पवार साहेबांसोबतच राहिलो आणि आताही पवार साहेबांसोबतच राहणार आहे. आज तरी असा कुठलाही गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता नाही. चर्चांना काहीच अर्थ नाही, असे एकनाथ खडसेंनी म्हटले.
शरद पवार जे निर्णय घेतील, त्यानुसार माझाही निर्णय असेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या सर्व चर्चांकडे लक्ष न देता, पक्ष विस्तार कसा होईल यावर भर द्यावा. पवार साहेबांचे निर्देशच आपल्यासाठी अंतिम असतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
