श्रीरामपूर पोलिसांची आजवरची सर्वात मोठी कारवाई : 14 कोटींच्या अंमली पदार्थासह दोघे जाळ्यात

गणेश वाघ
Srirampur Police’s biggest operation so far: Two arrested with drugs worth Rs 14 crore श्रीरामपूर (15 मे 2025) : श्रीरामपुर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका वाहनातून तब्बल 14 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केल्याने तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर व रकमेचा अंमली पदार्थ प्रथमच श्रीरामपूर पोलिसांनी पकडल्याने या कारवाईचे पोलीस दलातून मोठे कौतुक होत आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
श्रीरामपूर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना एका वाहनातून अंमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या निदेशानंतर पोलीस पथक व पंचासह एमआयडीसी परिसरात दाखल झाले. छोटा हत्ती टेम्पो (क्र.एम एच 20 बीटी 0951) हा खंडाळ्याकडुन दिघी गावाकडे येत असताना पथकाने त्यास अडवल्यानंतर चालकाला वाहनातील मालाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पंचांसमक्षी वाहनाची झडती घेतली असता गाडीच्या मागील बाजूस पांढर्या रंगाच्या 21 गोण्या दिसून आल्या. त्यापैकी 14 गोण्यांमध्ये पांढर्या रंगाची पावडर आणि उर्वरीत सात गोण्यामध्ये पांढर्या रंगाचे स्फटीक दिसून आले.
अल्प्राझोलम पदार्थासाठी लागणारी पावडर
वाहन चालक मिनीनाथ विष्णू राशीनकर (38, रा.धनगरवाडी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर) यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने वाहनातील स्फटीक हे अल्प्राझोलम औषधाचे असल्याचे सांगितले. गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनविण्याकरीता लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले. अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने त्याबाबत खात्री करण्याकरीता अहिल्यानगर येथील फॉरेन्सीक तज्ञांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
14 कोटींचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी सहा कोटी 97 लाख 67 हजार रुपये किंमतीचे सात गोण्यांमधील 69.767 कि. ग्रॅ वजनाचे अल्प्राझोलम चे स्फटिक (क्रिस्टल) तसेच सहा कोटी 76 लाख 74 हजार रुपये किंमतीचे 14 गोण्यांमधील 338.37 कि. ग्रॅ वजनाचे अल्प्राझोलम बनवण्यासाठीची पावडर तसेच एक लाख रुपये किंमतीचे वाहन मिळून 13 कोटी 75 लाख 41 हजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी चालकाने हा माल विश्वनाथ कारभारी शिपनकर (रा.दौंड, जि. पुणे) दिल्याची कबुली दिल्यान शिपनकर व चालक राशीनकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
तपास डीवायएसपी बसवराज शिवपुजे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, किशोर औताडे, सोमनाथ मुंडले, संपत बडे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अमोल पडोळे, अजित पटारे, अकबर पठाण, आजीनाथ आंधळे, राहुल पौळ, रमेश रोकडे, झिने, चालक राजेश सूर्यवंशी, बाळासाहेब गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे नितीन चव्हाण, रवींद्र बोडखे, अमोल नागले, नितीन शिरसाठ, चालक दिलीप कुर्हाडे, अश्विनी पवार आदींच्या पथकाने केली.
