किनगाव येथील चौफुलीजवळ एका ऑटो गॅरेजला आग

30 लाखांचे नुकसान : अज्ञात व्यक्तीवर आग लावल्याचा संशय


Fire at an auto garage near the crossroads in Kingaon. यावल (31 मे 2026) : यावल तालुक्यातील किनगावातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील चौफुलीजवळ असलेल्या विशाल ऑटो गॅरेजला अचानक आग लागली. या आगीमध्ये दुकानातील स्पेअर पार्ट, ऑटोपार्टचे साहित्य, ऑईलचे डबे असे साहित्य जळून खाक झालेे. यात तब्बल 30 लाखोंचे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब बोलावण्यात आला होता. आगप्रकरणी शनिवारी यावल पोलिसात तक्रार देण्यात आली. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय आहे.

आगीमुळे उडाली खळबळ
किनगाव गावातून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्ग मार्गस्थ होतो. या राज्य मार्गावर असलेल्या डांभूर्णी चौफुलीजवळ विशाल ऑटो गॅरेज नावाचे विशाल कोळी (नायगाव, ता.यावल) यांचे गॅरेज आहे. या गॅरेजला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली. या आगीमध्ये दुकानात असलेले दुचाकी वाहनाचे विविध प्रकारचे स्पेअर पार्ट तसेच दुचाकी वाहनात टाकले जाणार्‍या ऑईलचे कॅन्स तसेच विविध साहित्य असे जळून खाक झाले. यामध्ये तब्बल 30 लाखांचे नुकसान झाले.

आग विझवण्यासाठी यावलच्या अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले होते. आग विझवण्यासाठी फायरमन कल्पेश बारीसह त्यांच्या सहकार्‍यांनी परिश्रम घेतले व आग इतरत्र पसरू दिली नाही. दरम्यान या आगीत कोळी यांचे संपूर्ण दुकानात जळून खाक झाले तर या आग प्रकरणी यावल पोलिसात तक्रार देण्यात आली.

अज्ञातावर आग लावल्याचा संशय
आमच्या दुकानात शॉर्टसर्किट किंवा इतर काही प्रकारामुळे आग लागली नाही व शॉर्टसर्किट झाले नसल्याने अज्ञात व्यक्तीने हेतू पुरस्कर ही आग लावल्याचा संशय आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक हे कृत्य केले असल्याचा संशय विशाल ऑटो पार्टचे व्यवस्थापक विशाल कोळी यांनी व्यक्त केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !