आरोग्य विभाग कर्मचार्‍यांअभावी सलाईनवर : कंत्राटी भरतीलाही मुहूर्त सापडेना : पाच महिन्यापासून फाईल मंजुरी अभावी पडून


Health department on edge due to lack of staff: No time for contractual recruitment either: Files languishing for five months without approval जळगाव (19 मे 2025) : जळगाव जिल्ह्यात अपुर्‍या कर्मचार्‍यामुळे आरोग्य सेवेची पुरती वाताहत झाली आहे. ग्रामीण रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने त्याचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन अभियानांतर्गत होणारी कंत्राटी कर्मचार्‍यांचीही भरती गेल्या वर्षभरापासून झालेली नाही. यामुळे कर्मचारी नसल्याने आरोग्य सेवा पुरवताना कार्यरत कर्मचार्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन अभियान अंतर्गत करण्यात येणार्‍या कंत्राटी भरतीची फाईल पाच महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पडून असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती होऊ शकलेली नाही.

जळगाव जिल्ह्यात शहरी भागात शासकीय आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 15 ग्रामीण रुग्णालय असून ग्रामीण भागात 78 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्य सेवा पुरवली जाते. मात्र या रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता, आरोग्य सहाय्यक, तंत्रज्ञ, यासह आरोग्य सेवेसाठी महत्वाची कर्मचार्‍यांची पदे मोठया प्रमाणावर गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत.

पाच महिन्यापासून भरतीची फाईल सीईओंकडे पडून
आरोग्य सेवा पुरवताना राज्य शासन तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशन अभियान अंतर्गत कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाते मात्र गेल्या वर्षभरापासून या अभियान अंतर्गत जिल्ह्यात कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे कार्यरत असलेल्या जेमतेम कर्मचार्‍यांवरच जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा गाडा सुरु आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर व चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा पुरविताना कार्यरत कर्मचार्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांच्या भरती प्रक्रियेची फाईल मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या टेबलवर गेल्या पाचसहा महिन्यापासून पडून आहे. मात्र ही भरती प्रक्रिया मंजुरीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे
महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या आरोग्य सेवेची अपुर्‍या कर्मचारी संख्येअभावी वाताहत झाली असून गोरगरीब रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी याची गांभीर्याने दखल घेवून राष्ट्रीय आरोग्य मिशन अभियान अंतर्गत रिक्त जागांवर कर्मचार्‍यांची तातडीने भरती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !