अंदाज समितीला 15 कोटी देण्याची डील : पैसे न देणार्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा होता इशारा : खासदार संजय राऊतांचा दावा

Deal to pay Rs 15 crore to the estimates committee : There was a warning to blacklist contractors who did not pay: MP Sanjay Raut claims मुंबई (22 मे 2025) : धुळे जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या अंदाज समितीला देण्यासाठी साडेपाच कोटी जमा केल्याचा आरोप धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता तर पुराव्यादाखल समिती अध्यक्षांचा स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने बुक असलेल्या 102 क्रमांकाच्या खोलीत घबाड असल्याचा दावा केल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री केलेल्या तपासणीत या खोलीत तब्बल एक कोटी 84 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकारानंतर ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर व समितीवर निशाणा साधत टीका केली आहे.
तर ठेकेदारांना ब्लॅक लिस्टेड करण्याची धमकी
राऊत म्हणाले की, धुळ्यातील विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या खोलीत मागील तीन दिवसांत पाच कोटी रुपयांची कॅश जमा झाली होती. विधिमंडळाची अंदाज समिती, तिचे अध्यक्ष अशा प्रकारच्या कामांच्या तपासणीसाठी धुळ्याच्या दौर्यावर होते. तेथील ठेकेदारांनी आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी या अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटींची रक्कम गोळा करून देण्याची जबाबदारी घेतली होती. त्यासाठी त्यांनी अंदाज समिती अध्यक्षांचे पीए पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. रक्कम गोळा न झाल्यास ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आली, असा आरोप राऊत यांनी केला.

ही तर ईडीची केस
राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सध्या भ्रष्टाचाराच्या चिखलात गटांगळ्या खात आहे. अर्जुन खोतकरांनी धुळ्याच्या विश्रामगृहात 15 कोटी रुपये गोळा केले हे सांगण्यासाठी ब्रह्मदेवाची गरज नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही ईडीची केस आहे, असे ते म्हणालेत. संजय राऊत यांच्या या आरोपांमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
ईडीला घाबरून खोतकरांनी पक्ष सोडला
राऊत म्हणाले की, विधी मंडळाची अंदाज समिती ही शासनाची जी कामे होतात, ती योग्य प्रकारे नियमानुसार झालीत की नाहीत याचा तपास करते. त्यासंबंधीचे साक्षी पुरावे तपासते. पण ही समिती किती भ्रष्ट आहे, विशेषतः या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर किती भ्रष्ट आहेत हे आता समोर आले आहे. खोतकर पूर्वी आमच्याकडेच होते. ते निष्ठेच्या आणा-भाका फार खायचे. एकनाथ शिंदे पळून गेले तेव्हा ते त्यांना उंदीर म्हणाले होते. पण त्यानंतर ते स्वतःच ईडीला घाबरून शिंदे गटात गेले. त्यानंतर त्यांना अंदाज समितीचे अध्यक्षपद भ्रष्टाचार करण्यासाठी दिले.
अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटी रुपये देण्याचा सौदा झाल्यानंतर साडेपाच कोटी रुपये जमा झाले व उर्वरित 10 कोटी पुढील 2 दिवसांत जमा होणार होते, हे मी फार जबाबदारीने सांगत आहे. हे पैसे मिळाले नाही तर सर्वच ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची धमकी खोतकरांनी दिली होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करेन असे ते म्हणाले होते, असे संजय राऊत म्हणाले.
