दाल में कुछ काला है ; रोहिणी खडसे यांचा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल

मुंबई (22 मे 2025) : छगन भुजबळांच्या शपथविधीवेळी त्यांच्या स्वागतासाठी सर्वात पुढे असणार्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या वैष्णवी प्रकरणावर काहीही बोलल्या नाही पण आता त्यांचे वरातीमागून घोडे सुरू असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे.
महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती मागून घोडे
रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी पोलिसांना वैष्णवी हगवणे प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यावर रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती मागून घोडे असा पलटवार केला आहे. सत्तेतील सर्वच लोक आपला म्हणून हगवणेला वाचवत आहेत त्यामुळे आरोपी अजूनही सापडत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

बाईंना जबरदस्तीने प्रतिक्रिया द्याला सांगितली का?
रोहिणी खडसे आपल्या पोस्टमध्ये यासंबंधी म्हणाल्या, वैष्णवी शशांक हगवणे (23) ची केस ही पुण्याची आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. हगवणे हा दादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. पण अजितदादानी अद्यापही या प्रकरणात शब्द उच्चारला नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत. त्यांनीही हगवणेच्या हकालपट्टीची नोटीस काढायला हवी होती. पण अजूनही त्यांची हकालपट्टी केली गेली नाही. एरवी सर्व गोष्टींमध्ये बोलणार्या चित्रा वाघही या प्रकरणात गप्प आहेत. याचा अर्थ असा की, सत्तेतील सर्वच लोक आपला म्हणून हगवणेला वाचवत आहेत त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही. त्यांची हकालपट्टी होत नाही. उलट त्यांची पाठराखण केली जात आहे.
