अमेरिकेचा इराणवर हवाई हल्ला : फोर्दो अणुऊर्जा केंद्राचे प्रचंड नुकसान

US airstrike on Iran: Fordow nuclear power plant suffers heavy damage नवी दिल्ली (22 जून 2025) : अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे.
इराणमध्ये घुसून अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर जोरदार हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी एकाचवेळी बॉम्बचा वर्षाव केला. यात फोर्दो अणुऊर्जा केंद्राचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला इराणच्या अधिकार्यांनी दुजोरा दिला आहे.
अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी एकाच वेळी बॉम्ब टाकले. सर्व विमान सुरक्षितपणे इराणच्या हद्दीतून बाहेर पडली आणि आपापल्या ठिकाणी पोहचली असेही ट्रम्प म्हणाले.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, एका इस्रायली अधिकार्याने सांगितले की, इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्यासाठी इस्रायलने अमेरिकेला पूर्णपणे साथ दिली. या मोहिमेसाठी व्यवस्थित समन्वय ठेवण्यात आला होता. इराणवर हल्ला करण्यापूर्वी लढाऊ विमाने गुआम या तळावर आणण्यात आली.
अमेरिकेच्या एका अधिकार्याने सांगितले की, इराणमधील अणुऊर्जा केंद्रावर करण्यात आलेल्या हल्ल्यासाठी बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर करण्यात आला. अमेरिकेच्या बंकर बस्टर्स बॉम्बमुळे इराणच्या अणुऊर्जा केंद्रांचे मोठे नुकसान झाले आहे.
इराणमधील विभागीय अधिकार्याने अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इस्फहान, नतांज आणि फोर्दो अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्यात आले आहेत. काही तासांपूर्वी फोर्दो अणुऊर्जा केंद्रावर शूत्र राष्ट्राच्या हवाई दलाने हल्ले केले. फोर्दो येथे शुद्ध केलेले युरेनियम असून, बंकर बस्टर्स बॉम्बचा वापर करण्यात आला आहे.
इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीचे उप राजकीय संचालक हसन अबेदिनी यांनी सांगितले की, अणुऊर्जा केंद्र असलेली ठिकाणे आधीच रिकामे करण्यात आली होती.
अणुऊर्जा प्रकल्पांचे कोणतेही नुकसान नाही : इराणचा दावा
इराणचे या हल्ल्यामध्ये कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. कारण तिथले पदार्थ आधीच दुसरीकडे हलवण्यात आले होते. कौम प्रांताचे आपत्ती व्यवस्थापन प्रवक्ते मोर्तजा हैदरी यांनी सांगितले की, फोर्दो अणुऊर्जा केंद्राचा एक मोठ्या भागाचे हल्ल्यामुळे नुकसान झाले आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी फोर्दो अणुऊर्जा केंद्र उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे.
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर नागरिकांसाठी कोणताही धोका नसल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पांचे कोणतेही नुकसान झालेले नाही आणि नागरिकांना रेडिएशनचा धोका नाही, असं इराणने म्हटलं आहे. मात्र ट्रम्प यांनी आपल्या भाषणात हा हल्ला यशस्वी झाल्याचे म्हटलं होतं. तसेच त्यांनी इशारा देत इराणला शांततेकडे वाटचाल करण्यास सांगितले.
दुसरीकडे, अमेरिकेने अणुप्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यानंतर सौदी अरेबिया किंवा इतर आखाती देशांमधल्या वातावरणात कोणतेही किरणोत्सर्गी पदार्थ आढळले नसल्याचे सौदी अरेबियाने म्हटले. अणुप्रकल्पांजवळ राहणार्या रहिवाशांना कोणताही धोका नसल्याचे सौदीकडून सांगण्यात आलं.
