800 कोटींचा भ्रष्टाचार : जेएनपीएच्या तत्कालीन मुख्य व्यवस्थापकांसह चौघांविरोधात गुन्हा


Corruption worth Rs 800 crore: Case filed against four including then chief manager of JNPA मुंबई (22 जून 2025) : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे (जेएनपीए) तत्कालीन मुख्य व्यवस्थापकासह चौघांनी 800 कोटींचा भ्रष्टाचार केल्याची बाब केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) चौकशीत उघड झाली असून भ्रष्टाचार आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, सीबीआयने मुंबई व चेन्नई येथे पाच ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
जेएनपीएचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक सुनील कुमार मदभावी (पीपी डब्ल्यूडी), टीसीईचे प्रकल्प संचालक देवदत्त बोस, मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स (मुंबई), मे.बोस्कालीसस्मीत इंडिया (मुंबई) व मे. जान दे नुल ड्रेगिंग (चेन्नई) व इतर अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जेएनपीएच्या तत्कालीन अधिकारी आणि दोन खासगी कंपन्यांनी संगनमत करून गुन्ह्याचा कट रचला. त्यात दोन कंपन्यांचाही सहभाग होता. याप्रकरणी सीबीआयने जून 2022 मध्ये प्राथमिक चौकशी सुरू केली होती. तक्रारीनुसार, आरोपी कंपन्यांना न्हावा शेवा येथील जेएनपीटी येथील जहाजांना येण्या-जाण्याच्या मार्गातील खोली वाढवण्याचे कंत्राट दिले होते तर या प्रकल्पासाठी एका खासगी सल्लागार कंपनीला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमले होते.

प्रकल्पाच्या टप्पा-1 मध्ये मार्गांची खोली वाढवण्यासह गाळ काढण्यात आला. यावेळी खोट्या दाव्यांच्या आधारावर 365 कोटी 90 लाख रुपये देण्यात आले. पहिल्या टप्प्यात 2010 ते 2014 दरम्यान, तर दुसर्‍या टप्प्यात 2012 ते 2019 दरम्यान कामे झाल्याचे दाखवले.

दोन्ही टप्प्यांमधील 2012 ते 2014 हा देखभालीचा कालावधी सारखाच होता. त्यानंतरही त्या काळात 438 कोटींची अतिरिक्त रक्कम दिली. त्यावरून पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षात कोणतेही अतिरिक्त खोदकाम अथवा गाळ काढण्याचे काम झाले नसतानाही मोठ्या प्रमाणात रक्कम दिल्याचे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !