भुसावळातील प्राथमिक शिक्षक पतपेढीत एक कोटी 94 लाखांचा अपहार

दहा कर्मचारी बडतर्फीच्या उंबरठ्यावर : गैर कर्जदारांच्या नावावर सभासदांची कर्ज रक्कम केली वर्ग


One crore 94 lakhs embezzled from primary teachers’ credit union in Bhusawal भुसावळ (22 जून 2025) : शहरातील शिक्षकांच्या प्राथमिक शिक्षक नूतन सहकारी पतपेढीत शिक्षकांच्या नावावर कर्ज प्रकरण करून ही रक्कम गैरकर्जदारांच्या नावावर वर्ग करीत तब्बल एक कोटी 93 लाख 86 हजार 250 रुपयांचा आर्थिक अपहार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अपहार कांडानंतर शिक्षकांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विद्यमान पदाधिकार्‍यांनी कर्जाची रक्कम शिक्षकांना मिळाल्याची खातरजमा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस येताच जळगावच पोलिस अधीक्षकांसह स्थानिक शहर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. अपहार कांडाला जवाबदार असलेल्या पतपेढीतील दहा कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्याचा ठराव संमत करीत त्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असा घडला अपहार
भुसावळातील यावल रस्त्यावरील पतपेढीच्या सभागृहात रविवारी दुपारी दोन वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सभापती प्रदीप सोनवणे, उपसभापती कल्पेश चौधरी तसेच सर्व संचालक मंडळांनी अपहाराची सविस्तर माहिती दिली. सभापती सोनवणे यांनी म्हणाले की, अपहार प्रकरणात संस्थेचे लिपिक अभिजीत तायडे, चिटणीस व हिशोबनीस राजू गायकवाड, आरटीजीएस फाईल तयार करणारे कर्मचारी हितेश संजय नेहते, माजी सभापती गंगाराम फेगडे, हरिश्चंद्र बोंडे व इतरांच्या सहभागामुळे ही आर्थिक हेराफेरी घडली. पतपेढीचे लेखा परीक्षण न झाल्याने तसेच त्यास विलंब झाल्यानेच हा अपहार घडल्याचे समोर आले आहे.

दहा कर्मचारी बडतर्फीच्या उंबरठ्यावर
22 जून 2025 रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत, गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या 10 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्याससंदर्भात अंतिम कारणे दाखवा नोटीस देण्याचा ठराव रविवारच्या बैठकीत संमत करण्यात आला. त्यात राजू गायकवाड, पंकज ढाके, हितेश नेहते, जितेंद्र फेगडे, हितेंद्र वाघुळदे, राजेश लहासे, राहुल चौधरी, अभिजीत तायडे, अझरुद्दीन तडवी, पंकज भागवत चौधरी आदींचा समावेश आहे.

पाच वर्षापासून लेखा परीक्षण रखडल्याने अपहार
गेल्या पाच वर्षांपासून (2020-21 ते 2024-25) पतपेढीचे लेखापरीक्षण झालेले नसल्यामुळे हा प्रकार उघडकीस यायला विलंब झाला. सध्या उपनिबंधक व लेखापरीक्षक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे शासकीय लेखा परीक्षणाची मागणी 9 जून 2025 रोजी सादर करण्यात आली. यानंतर आधीची माहिती मिळेल, असे सभापती म्हणाले. यापूर्वीच्या लेखापरीक्षक पी.पी. चौधरी यांच्या कामकाजावरही संशय व्यक्त करण्यात आला असून 2020-21 चा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. पुढील लेखापरीक्षक एम.व्ही. ढोले यांनी या कारणामुळे लेखापरीक्षण करणे शक्य नसल्याचे सांगितल्याचे सभापती म्हणाले.

कारवाईचा आसूड उचलताच सात रुपये वसूल
विद्यमान संचालक मंडळासह सभापतींनी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज फाटे करताच अपहार झालेल्या रकमेमधून सात लाख रुपये परत मिळवण्यात संस्थेला यश आले. उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

सभासदांचा पैसे सुरक्षित ठेवण्याची जवाबदारी आमची ः सभापती
प्राथमिक शिक्षक पतपेढी ही आदर्श संस्था आहे. शिक्षकांच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मोठे योगदान पतपेढीने दिले आहे. घडलेल्या प्रकार दुर्दैवी आहे. गैरकारभार करणार्‍यांना पाठीशी घालणार नाही. सभासदांचा पैसा सुरक्षित ठेवण्याची पूर्ण जबाबदारी आमची असून पतपेढीला गतवैभव प्राप्त करून देऊ, असे सभापती प्रदीप सोनवणे म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !