जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी ; महादेव हॉस्पिटल सज्ज ; 15 रुग्णांचा लाभ
चौकशीचे शेकडो फोन, रात्री अपरात्री आता ताबडतोब सेवा मिळणार, रुग्णांना दिलासा
जळगाव (28 एप्रिल 2026) : जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.रूग्णांच्या सेवेसाठी महादेव हॉस्पीटल सज्ज झाले असून पहिल्याच दिवशी 15 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या उपक्रमामुळे जिल्हा व शहरातील रूग्णांना रात्री अपरात्री दवाखाने पालथे घालावे लागणार नसून महादेव हॉस्पिटल हे 24 तास सेवा देणारे सुसज्ज रुग्णालय असून येथे अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टर व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यांच्या माध्यमातून विविध आजारांवर उपचार केले जातात. आता या योजनेअंतर्गत रुग्णांना स्पेशॅलिटी, सुपर स्पेशॅलिटी तसेच अतिदक्षता विभागात मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड यापैकी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हृदयविकार, मेंदू व न्यूरो विकार, हाडांचे फ्रॅक्चर, किडनी स्टोन व डायलिसिस, कॅन्सर, बालरोग व महिला आजार तसेच हर्निया, अपेंडिक्स, कान-नाक-घसा आदी विविध शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

आर्थिक अडचणीमुळे कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक रुग्णाला दर्जेदार व तत्पर उपचार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.महादेव हॉस्पिटलमध्ये ही योजना सुरू झाल्याने जळगाव जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून आरोग्य सेवेत हे एक महत्त्वाचे सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
