खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या आदर्श जलव्यवस्थापनाचा जागर करत दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


चाळीसगाव (29 एप्रिल 2025) : खान्देशाचे प्रवेशद्वार असलेल्या चाळीसगाव येथे गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे मंगळवार, 28 एप्रिल 2026 रोजी भव्य व उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित या जलयात्रेचा प्रारंभ त्र्यंबकेश्वर मंदिर व चौंडी येथून झाला होता.

आमदारांच्या नेतृत्वात स्वागत सोहळा
जलयात्रा चाळीसगावमध्ये दाखल होताच कन्नड घाट पायथ्याशी दस्तुरी फाटा येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भव्य स्वागत सोहळा पार पडला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा खासदार रामरावजी वडकूते, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर तसेच संत-महंत व हजारो जलयात्री मोठ्या संख्येने उपस्थित होते. दस्तुरी फाटा येथे बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

यानंतर जलयात्रेचे शहरात नागद रोड चौफुली मार्गे आगमन झाले. पाटणादेवी रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. पुढे घाट रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जलयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

प्रसंगी भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीने जलयात्रींसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. जाहीर सभेत धनगर समाजाच्या वतीने मान्यवरांचा पारंपरिक धनगरी घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला.

नेत्यांनी सांगितले जलयात्रेचे महत्त्व
सभेत बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रामरावजी वडकूते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पाण्याच्या शाश्वत वापराबाबत जागृती करण्यासाठी या जलयात्रेचे महत्त्व अधोरेखित केले. वारसा, विचार आणि विकास या संकल्पनेवर आधारित ही जलयात्रा समाजमनात पाण्याबाबत जागृती निर्माण करणारी व्यापक चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रजा हीच दैवत या विचारातून सुशासनाची दिशा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, निवडणुकांशिवाय केवळ जलजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेली ही जलयात्रा कौतुकास्पद असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पासाठी महत्त्वपूर्ण आहे. केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर जळगाव जिल्हा व चाळीसगाव मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना गती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून विविध प्रलंबित प्रकल्प पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. नारपार प्रकल्पाचे काम सुरू झाले असून वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पामुळे सुमारे 18 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या जलयात्रेत काशी विश्वनाथ मंदिराची आकर्षक प्रतिकृती, 130 नद्यांचे पाणी असलेला जलकलश आणि अहिल्यादेवी होळकर यांची भव्य प्रतिमा असलेले रथ विशेष आकर्षण ठरले. नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रम जल्लोषात पार पडला.

या उपक्रमातून पाणी वाचवा, पाणी साठवा हा संदेश देत जलसंवर्धन, पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती करण्याचा ठाम प्रयत्न करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !