भुसावळात ‘कचरा कोंडी’ ; डिझेलअभावी घंटागाड्या ठप्प

घराघरातील कचरा रस्त्यावर ; कर्मचार्‍यांना वेतनाची चिंता, प्रशासन मात्र सुस्त


‘Garbage Gridlock’ in Bhusawal ; Waste Collection Trucks Grounded Due to Diesel Shortage भुसावळ (6 मे 2026) : शहरातील स्वच्छतेचा कणा असलेली घर ते घर कचरा संकलन व्यवस्था सध्या पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. पालिकेच्या घंटागाड्यांना डिझेल मिळत नसल्याने त्यांची चाके जागेवरच खिळली आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही समस्या तीव्र होत असून, नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

1 मे पासून घंटागाड्या थांबल्या
पालिका प्रशासनाकडून घंटागाड्यांसाठी आवश्यक असलेल्या डिझेलचा पुरवठा थांबल्याने 1 मे पासून अनेक गाड्या रस्त्यावर उतरल्याच नाहीत. शहरातील बहुतांश भागांमध्ये कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झाले असून, रस्त्यांवर व कचराकुंड्यांमध्ये कचर्‍याचे ढिग साचले आहेत.



शहरभर कचराकुंड्या ओसरल्या
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून ही समस्या डोके वर काढत असली तरी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. शहरातील अनेक भागांत कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. साचलेल्या कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरली आहे. डास व माशांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यात ही अस्वच्छता नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

30 वर घंटागाड्या बंद
पालिकेकडे एकूण सुमारे 60 घंटागाड्या असल्या तरी त्यापैकी तब्बल 28 ते 30 गाड्या सध्या बंद अवस्थेत आहेत. या गाड्यांची मागील महिन्यापासून दुरुस्तीही झालेली नाही. त्यामुळे भविष्यात डिझेल पुरवठा सुरू झाला तरी अपुर्‍या गाड्यांमुळे संपूर्ण शहरात कचरा संकलन सुरळीत होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्याधिकारी राजेंद्र फातले रजेवर असून एरंडोल प्रभारी मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्याकडे पदभार आहे. त्यातच अनेक विभागांचे अधिकारीही रजेवर असल्याने पालिकेचा कारभार अक्षरशः वार्‍यावर आल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

सत्तापरिवर्तनानंतरी मूलभूत सुविधा शून्य
शहरात सत्तापरिवर्तन होऊनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, सामान्य नागरिक मात्र कचर्‍याच्या ढिगार्‍यात अडकले आहेत. किमान स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. तातडीने घंटागाड्यांसाठी डिझेलचा पुरवठा सुरू करून, बंद पडलेल्या गाड्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. अन्यथा भुसावळ शहरात निर्माण झालेली ही अस्वच्छतेची भीषण परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्यावर साचले ढीग
गेल्या काही दिवसांपासून परिसरात कचरा उचलायलाच कोणी येत नाही. रस्त्यावर कचर्‍याचे ढिग साचले असून दुर्गंधीने जगणे कठीण झाले आहे. आरोग्याची विशेष चिंता वाटत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, असे राजेंद्र कोळी (सरस्वती नगर, भुसावळ) म्हणाले.

मूलभूत सुविधांची वाणवा
आम्ही नियमित कर भरतो, पण बदल्यात मूलभूत स्वच्छतेचीही सुविधा मिळत नाही, ही खंत आहे. घंटागाड्या बंद असल्याने कचरा टाकण्यासाठी पर्याय उरलेला नाही. पालिकेने त्वरित उपाययोजना करून शहर स्वच्छ करणे गरजेचे असल्याचे नागरिक सुब्रतो मित्रा म्हणाले.

दोन दिवसात समस्या सुटणार : मुख्याधिकारी
डिझेल नसल्याने घंटागाड्या शहरात फिरण्याची समस्या निर्माण झाली आहे. संबंधितांना त्यांचे एक देयक तातडीने अदा करण्यात आले असून आज डिझेलची उपलब्धता होणार असून एक-दोन दिवसात घंटागाड्यांची सेवा पूर्ववत होईल, असे प्रभारी मुख्याधिकारी अमोल बागुल म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !