अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम
जळगाव (8 मे 2026) : अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल 8 मे रोजी जाहीर झाला. त्यात पहिल्या क्रमांकावर अथर्व श्रीपाद कासार याने 851 गुण मिळवत 89 टक्के गुणांसह शाळेत अव्वल स्थान पटकावले. दुसर्या क्रमांकावर गिरीश भारत पाटीलने 88.20 टक्के मिळवले. तिसर्या क्रमांकावर प्रतीक चंद्रकांत सपकाळेने (87.20 टक्के), चौथ्या क्रमांकावर प्रिया विजय पाटील (85.60 टक्के) तर पाचव्या क्रमांकावर स्नेहल धर्मराज इंगळे (83.80 टक्के) गुण मिळवले. प्रतिकूलतेत देखील या विद्यार्थ्यांनी हे सुयश संपादन केले त्याबद्दल त्यांचे कौतुक अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी व शिक्षकांनी केले.
जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी यांनी अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल शाळा 2011 मध्ये सुरू केली. त्यांच्या संकल्पनेनुसार प्रयोगात्मक शिक्षण, प्रकल्प, गटचर्चा, शैक्षणिक खेळ, फील्ड व्हिजिट्स यांद्वारे मुलांनमध्ये चांगल्या नागरीक होण्याचे संस्कार होतात. विद्यार्थ्यांना पोषक आहार, कपडे, पुस्तके, शैक्षणिक साहित्य व वैद्यकीय सेवा अनुभूती स्कूलमध्ये दिली जाते. संगीत, नृत्य, कला, क्रीडा यांसारखे सहशालेय उपक्रम नियमित राबविले जातात. या शाळेचा निकाल या वर्षी देखील शंभर टक्के लागला आहे. त्यातील 11 विद्यार्थ्यांनी 80 ते 90 टक्क्यांच्या दरम्यान, तर 70 ते 80 टक्के गुणांच्या दरम्यान 12 विद्यार्थ्यांनी गुण मिळविलेले आहेत, उर्वरित विद्यार्थ्यांनी 60 गुणांच्यावर गुण मिळविलेले आहेत. 30 पैकी 30 विद्यार्थ्यानी उत्तीर्ण होऊन शाळेच्या निकालात शंभर टक्के सातत्य ठेवले आहे.


शाळेच्या स्थापनेपासून निकालाची शंभर टक्के आकडेवारी
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करून, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीशी सामोरे जात मिळवलेले यश हे केवळ शैक्षणिक कामगिरी नाही, तर समाजाच्या आशा-आकांक्षांना नवा प्रकाश, ऊर्जा देणारे उदाहरण म्हणता येईल. संघर्षाच्या वाटेवरून चालताना विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिद्द ही शिक्षणाच्या शक्तीची खरी ओळख ठरते. शाळेच्या स्थापनेपासून सातत्याने 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवणे ही केवळ आकडेवारी नव्हे, तर शिक्षकांच्या अथक परिश्रमांची, विद्यार्थ्यांच्या मेहनतीची साक्ष आहे. या परंपरेतून शिस्त, संस्कार आणि एकात्मतेचे मूल्य समाजासमोर अधोरेखित होते, अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी दिली.
