भुसावळ नगराध्यक्षा अपात्र : शैलजा नारखेडे यांनी प्रभारी पदभार स्वीकारला
माजी आमदार चौधरी म्हणाले : न्यायालयाच्या निर्णय येईपर्यंत गायत्री भंगाळेच नगराध्यक्षा : भाजपाने मात्र फटाक्यांची आतषबाजी करीत केला जल्लोष
भुसावळ (11 मे 2026) : भुसावळ नगराध्यक्षपदावरुन राजकीय कलगीतुरा सुरू असतानाच अलीकडे जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर राज्य शासनाने गायत्री भंगाळे-गौर यांना अपात्र ठरवल्यानंतर भुसावळच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला व सत्ताधार्यांसाठी ही बाब धक्कादायक ठरली होती. नगराध्यक्षा अपात्र असल्याने कायद्याला धरून उपनगराध्यक्षा याच प्रभारी नगराध्यक्षा असल्याने भाजपा पदाधिकार्यांच्या उपस्थितीत शैलजा नारखेडे यांनी सूत्रे हाती घेतली. तत्पूर्वी पदाधिकार्यांनी फटाक्यांची आतषबाजी केले व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला वंदनही केले. दरम्यान, माजी आमदार संतोष चौधरी यांनी गायत्री भंगाळे याच नगराध्यक्षा असल्याचे म्हणत न्यायालयाचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचे सांगितले.
जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर भंगाळे अपात्र
भुसावळ नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री रुपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे या निवडून आल्या होत्या मात्र त्यांचे जातप्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समिती, जळगाव यांनी अवैध ठरवले व हाच निर्णय राज्य शासनानेही 4 मे रोजीच्या आदेशात कायम ठेवला होता. 23 एप्रिल 2026 पासून भंगाळे यांची भूतलक्षी प्रभावाने निवड रद्द ठरवण्यात आली होती.


एकीकडे याचिका तर दुसरीकडे राजकारण पेटले
भंगाळे यांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असलीतरी खंडपीठात जातपडताळणीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर सहा आठवड्यांनी या संदर्भात अंतीम सुनावली ठेवली आहे. तो पर्यंत भंगाळे यांच्याविरोधात कुठलीही कारवाई होणार नसल्याने त्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. एकीकडे भंगाळे अपात्र झाले असताना दुसरीकडे शहराचे राजकारण देखील पेटले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना सर्वसामान्य नागरिक मात्र सुविधांपासून वंचित ठरले आहेत.
भाजपाच्या नारखेडेंनी स्वीकारला पदभार
एकीकडे नगराध्यक्षा अपात्र झाल्यानंतर शैलजा नारखेडे यांनी सोमवार, 11 मे रोजी अधिकृतरित्या पदभार स्वीकारला. तत्पूर्वी भाजपेयींनी त्यांच्या निवडीचे स्वागत करीत फटाक्यांची आतषबाजी केली व लोहपुरूष सरदार पटेल यांच्या पुतळ्याला वंदनही केले. यावेळी नारखेडे यांनी विविध विभागांचा आढावा घेतला तसेच सर्वसाधारण सभेसाठी सूचना केल्या तसेच 10 ते 12 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आणखी कमी दिवसांवर आणण्याचा मनोदय व्यक्त करीत अस्वच्छतेतून भुसावळकरांची सुटका होणार असल्याची ग्वाही दिली.
