महाजेनकोच्या सीएसआर निधीतून भुसावळ परिसरात व्यापक वृक्षारोपण हवे राष्ट्रवादी जिल्हायक्ष उमेश नेमाडे

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी संचालक अभय हरणे यांना निवेदन


भुसावळ (26 जून 2026) : दीपनगरातील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) औष्णिक वीज प्रकल्पातून दररोज सुमारे 2,200 मेगावॅट वीज निर्मिती होत असून या औद्योगिक प्रक्रियेचा परिसरातील पर्यावरणावर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. वाढते तापमान, भूजल पातळीत होणारी घट, हवामानातील बदल आणि शेती उत्पादनावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता, महाजेनकोच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून भुसावळ शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केली आहे.

महाजेनको संचालकांना निवेदन
यासंदर्भात नेमाडे यांनी महाजेनको प्रकल्प व जनरेशनचे संचालक अभय हरणे यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, यंदा भुसावळ शहर व परिसरातील तापमानाने विक्रमी उच्चांक गाठला असून त्याचा परिणाम नागरिकांचे आरोग्य, जनजीवन तसेच शेतीवर होत आहे. भविष्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने आतापासूनच प्रभावी पर्यावरणीय उपाययोजना करणे आवश्यक आहे.



मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा अभाव
महाजेनकोच्या सीएसआर धोरणानुसार प्रकल्पापासून 14 किलोमीटरच्या परिघात पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रम राबविण्याची तरतूद आहे. भुसावळ शहर या परिघात येत असतानाही, आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, हरित पट्टे निर्मिती किंवा पर्यावरण संवर्धनाचे प्रभावी उपक्रम राबविले गेले नसल्याची खंतही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, भुसावळ परिसरात शासनामार्फत विविध रस्त्यांचे चौपदरीकरण व विकासकामे करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली असून, त्याच्या तुलनेत झालेले वृक्षारोपण अत्यल्प आहे. वाढते काँक्रीटीकरण, जमिनीत पावसाचे पाणी न मुरणे, भूजल पातळीतील घट आणि उष्णतेची तीव्रता यामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडत असून त्याचा फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.

याशिवाय, भविष्यात महाजेनकोच्या प्रकल्पाची 800 मेगावॅट क्षमतेने वाढ होणार असल्याची माहिती समोर येत असल्याने संभाव्य पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी आतापासूनच व्यापक हरित उपक्रम राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

सीएसआर निधीच्या माध्यमातून सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, पर्यावरणप्रेमी गट व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, ठिबक सिंचन व्यवस्था, हरित पट्ट्यांची निर्मिती, शहरी वन संकल्पना आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित विविध उपक्रम हाती घेण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !