भुसावळात व्यावसायीकांच्या फलकांनी रस्ते व्यापले : वाहनधारक त्रस्त : वाहतूक शाखेसह पालिकेकडून कारवाईची अपेक्षा

भुसावळातील वाढत्या अतिक्रमणाची डोकेदुखी : लोकप्रतिनिधींनी साधली चुप्पी


Businessmen’s signboards encroach upon roads in Bhusawal; motorists inconvenienced ; action expected from the Traffic Branch and the Municipal Council भुसावळ (28 जून 2026) : शहरातील रस्ते अतिक्रमणांनी व्यापले असतानाच वर्दळीच्या बाजारपेठेत आता दुकानदारांनी आपापल्या दुकानांचे नाम फलक रस्त्यावर आणून ठेवल्याने वाहतुकीचे तीनतेरा झाले आहे. रोजच्या वाहतूक कोंडीत भुसावळकरांचा श्वास कोंडला असून शहर वाहतूक शाखेसह पालिकेने आता धडक कारवाई करावी, अशी अपेक्षा भुसावळकर व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे, जनतेच्या समस्यांवर आवाज उचलण्याची जवाबदारी असलेले लोकप्रतिनिधी चुप्पी साधून असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मॉडर्न रोडसह सराफ बाजार भागात वाहतुकीची कोंडी
शहरातील अत्यंत वर्दळीच्या मॉडर्न रोड भागातील अनेक व्यावसायीकांनी आपापल्या दुकानांचे नाम फलक रस्त्यावर आणून ठेवले आहेत. मुख्य वर्दळीचा हा रस्ता असताना या प्रकारामुळे रिक्षा, दुचाकी चालकांना वाहने चालवणे कठीण झाले असून पादचार्‍यांचीदेखील गैरसोय होत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये फळविक्रेते, व्यावसायिक तसेच मान्सून सेलच्या नावाखाली लावण्यात आलेले फलक आणि बॅनर यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.



पालिका प्रशासनाची डोळेझाक
वास्तविक शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्याची जवाबदारी पालिकेची आहे मात्र पालिकेत पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने सध्यातरी पालिका वार्‍यावर आहे तर प्रभारीराजमुळे कर्मचार्‍यांवर कुठलाही अंकुश नसल्याचे चित्र आहे. नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग असलातरी तो बेपत्ता झाल्याची भावना आहे.

पार्किंगचे दिवस ठरवावेत
वर्दळीच्या व्यापारी पेठेत वाहनधारक मनमानी पद्धत्तीने वाहने उभी करतो व वेळप्रसंगी त्यातून वाद होवून मारामार्‍या होवून कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होते. पालिका व पोलीस प्रशासनाने यातून समन्वय साधण्यासाठी पार्किंगचे दिवस निश्चित करावे व नियम न पाळणार्‍यांवर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहर वाहतूक शाखेने मोहिम राबवावी
शहरातील सराफ बाजार, आठवडे बाजार, शनी मंदिर परिसर, जवाहर डेअरी परिसर, गांधी मार्केट तसेच गांधी चौक ते सराफ बाजारापर्यंत रस्त्यावर सर्वाधिक वाहतूक कोंडी होते तर मरिमाता चौकात दुकानदारांनी मनमानी पद्धत्तीने आपल्या दुकानाचा भाग रस्त्यावर आणल्याने वाहतूक समस्या निर्माण होते. शहर वाहतूक पोलीस प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका न घेता कायद्याचा धाक निर्माण होईल या पद्धत्तीने कृती करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य भुसावळकर व्यक्त करीत आहे.

वर्दळीच्या भागात गस्त वाढवून कारवाई करणार
शहरातील सर्वच वर्दळीच्या भागात आता दोन वेळा गस्त वाढवली आहे शिवाय रस्त्यावर दुकानांचे फलक लावणार्‍या तसेच अतिक्रमण करणार्‍यांवर पोलीस प्रशासनाकडून निश्चितपणे कारवाई केली जाईल. पालिका प्रशासनाशी समन्वय साधून पार्किंगचे दिवस ठरवू, असे वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक राहुल भंडारे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !