धुळे गुन्हे शाखेची शिंदखेड्यात मोठी कारवाई : गुंगीकारक सिरपचा 18 हजारांचा साठा जप्त
शिरपूरातील संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल : 160 कफ सिरपच्या बाटल्या जप्त
Major operation by Dhule Crime Branch in Shindkheda: Stock of intoxicating syrup worth ₹18,000 seized धुळे (4 जुलै 2026) : मानवी मेंदूवर परिणाम होणारा गुंगीकारक औषधांचा साठा शिरपूर येथे नेला जात असल्याची माहिती धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने शिंदखेडा रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करीत शिरपूरातील संशयीताला बेड्या ठोकल्या. संशयीताकडील विनापरवाना विक्रीसाठी आणण्यात आलेल्या कोडीनयुक्त कफ सिरपच्या 160 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत 18 हजार 400 रुपये आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना संशयीत सुरत येथून शिंदखेडामार्गे शिरपूरात जात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवार, 3 जुलै रोजी शिरपूर शहरातील शिंदखेडा मार्गावरील रेल्वे स्टेशन रोडवरील कुमरेज फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी किरण वसंत सकटे (रा.मच्छीबाजार, शिरपूर) याच्या ताब्यातून कफ सिरपच्या 100 मिलीच्या 160 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. पोलीस तपासात या औषधांची कोणतीही वैध परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. मानवाच्या मेंदूवर विपरीत परिणाम करणार्या या औषधांची बेकायदेशीर विक्री करण्याचा आरोपीचा उद्देश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कफ सिरपचा पुरवठा कोठून झाला आणि त्यामागील रॅकेटचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, एपीआय दीपक ढोके, अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, संतोष हिरे, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार, हर्षल चौधरी, राहुल गिरी, प्रशांत माळे, संजय सुरसे आदींच्या पथकाने केली.
