कर्नाटक एक्स्प्रेसमधून गुटख्याची वाहतूक : पाचोर्यातील विक्रेत्याला भुसावळात बेड्या
17 हजारांचा गुटखा जप्त : रेल्वेतील गुटखा तस्करी ऐरणीवर
भुसावळ (रविवार, 19 जुलै 2026) : अप 12628 कर्नाटक एक्स्प्रेसमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने गाडी भुसावळात येताच संशय असलेल्या बोगीची झडती घेतली. यावेळी एका संशयीताला सुमारे 17 हजारांच्या गुटख्यासह पकडण्यात आले. विनय अर्जुन खेमानी (20, झुलेलाल गल्ली, सिंधी कॉलनी, भुसावळ) असे अटकेतील तरुणाचे नाव असून तो पाचोर्यात गुटखा विक्री करीत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांना अप कर्नाटक एक्स्प्रेसने राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. शनिवार, 18 रोजी दुपारी 1.50 वाजेच्या सुमारास गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक चारवर आल्यानंतर संशय असलेल्या जनरल कोचची तपासणी करण्यात आली. यावेळी तीन संशयीत बॅगा आढळल्याने त्यांची पंचांसमक्ष तपासणी केल्यानंतर त्यात विविध कंपनीचा सुगंधीत पानमसाला व तंबाखू आढळल्याने ती जप्त करण्यात आली. 17 हजार 152 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून संशयीत विनय अर्जुन खेमानी (20, झुलेलाल गल्ली, सिंधी कॉलनी, भुसावळ) विरोधात हवालदार विलास जगन्नाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस कर्मचारी जय कोळी, धनराज लुले, विलास जाधव, अंकुश लांडगे आदींच्या पथकाने केली.
गुटखा तस्करी ऐरणीवर
रस्ते मार्गे होणार्या गुटखा तस्करीवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असल्याने गुटखा माफियांनी आता रेल्वेद्वारे तस्करी सुरू केली आहे. राज्यात गुटखा विक्रीला बंदी असलीतरी नजीकच्या बर्हाणपूरमध्ये खुलेआम सहज गुटखा उपलब्ध होतो. रेल्वेतील वाढत्या गर्दी तस्करी आपल्या हस्तंकमार्फत रेल्वे गाडीने मोठ्या प्रमाणावर खान्देशात गुटखा आणत असून आता रेल्वे पोलिसांना कारवाईचा वेग अधिक वाढवावा लागणार आहे.