संतांच्या विचारांनी जीवनाचे कल्याण : भुसावळात राजेंद्र गवळी
भुसावळ (रविवार, 19 जुलै 2026) : आपले खरे कल्याण फक्त संतच करू शकतात. त्यासाठी संतांना पूर्णपणे शरण जायला हवे. अहंकार, काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि भेदभाव यांचा त्याग केल्याशिवाय संतांची कृपा लाभत नाही. माणसाचे मन बासरीसारखे आतून मोकळे असायला हवे, तरच आयुष्यात मधुरता येईल. संसारात पूर्ण सुख कधीही एकत्र नांदू शकत नाही, म्हणूनच प्रपंचात राहूनही प्रेममय भक्तीचा मार्ग संतांनी दाखवला आहे. संतांच्या विचारांनी जीवनाचे कल्याण असल्याचे विचार शहरात राजेंद्र गवळी यांनी व्यक्त केले.
शहरातील शिव कॉलनीतील श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक मंडळात साप्ताहिक सभेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून अध्यात्मिक अभ्यासक राजेंद्र गवळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दत्त प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी रघुनाथ पाटील यांनी जपमाळ घेतली तर विजय चौधरी यांनी सुश्राव्य अभंग गायन केले.


आता तुम्ही कृपावंत’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण करताना राजेंद्र गवळी म्हणाले, ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांच्या मार्गाने गेल्यास आपले जीवन नक्कीच गोमटे होईल. नारायण पाटील यांनी संतांच्या अभंगांमधून जीवन जगण्याची मोठी शिकवण मिळते, असे सांगितले. सूत्रसंचालन मंडळाचे सचिव बी.डी.चौधरी यांनी केले. प्रकाश विसपुते, प्रकाश तायडे, रामकृष्ण पाटील यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. सदस्यांची उपस्थिती होती.