भुसावळकरांना लवकरच सात दिवसाआड पाणी : भाजपा सत्ताधार्यांनी काढला हा ‘तोडगा’
14 लाख लिटर क्षमतेच्या नवीन साठवण टाकीस जिल्हाधिकार्यांकडून मंजुरी
भुसावळ (रविवार, 19 जुलै 2026) : बारमाही पाणीटंचाईचा सामना करणार्या भुसावळकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. अमृत योजनेला किमान दोन वर्षांचा अवधी लागणार असताना दुसरीकडे जीर्ण झालेल्या पाईपलाईनमधून होणार्या 15 ते 20 दिवसाआड पाणीपुरवठ्याने जनतेत नाराजीचे वातावरण असताना भाजपा प्रभारी सत्ताधार्यांनी या समस्येवर तोडगा काढला आहे. भुसावळातील जलशुद्धीकरण केंद्रात 14 लाख लीटर क्षमतेची नवीन साठवण टाकी (जीएसआर) उभारण्यात येत आहे. यासाठी जळगाव जिल्हाधिकार्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच सर्व प्रक्रिया होवून कामाला सुरूवात होईल व शहराला किमान सात ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा शक्य होईल, अशी माहिती प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे व पाणीपुरवठा सभापती महिमा नागराणी यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
आगामी काळात सात दिवसाआड मिळणार पाणी
भुसावळची पाणीपुरवठा योजना सुमारे 70 ते 75 वर्षे जुनी असल्याने ती आजच्या वाढत्या लोकसंख्येला अपूर्ण ठरते. जलशुद्धीकरण केंद्रात केवळ 10 लाख लिटर क्षमतेची साठवण टाकी उपलब्ध आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही क्षमता अत्यंत कमी असल्याने शहरवासीयांना 12 ते 15 दिवसाआड पाणी मिळते. शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे आणि पाणीपुरवठा समिती सभापती महिमा नागराणी यांनी जिल्हाधिकार्यांकडे नवीन साठवण टाकीसाठी प्रस्ताव पाठवला. यासोबतच वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार संजय सावकारे यांनीही या प्रश्नात लक्ष घालून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी चर्चा केली. या समन्वित प्रयत्नांमुळेच या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली.


एक कोटींचा खर्च मंजूर
कामासाठी सुमारे एक कोटी दोन लाख 74 हजार 939 रुपये खर्च मंजूर करण्यात आला. हा निधी पंधराव्या वित्त आयोगातून उपलब्ध होणार आहे. नगरपरिषदेने यापूर्वीच या कामासंदर्भात प्रशासकीय ठराव केला होता तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यताही प्राप्त केल्याने आता कामाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पाणीपुरवठ्याचे बदलणार रोटेशन
नवीन 14 लाख लिटर क्षमतेच्या टाकीमुळे सध्याच्या 10 लाख लिटर क्षमतेमध्ये भर पडून एकूण साठवण क्षमता 24 लाख लिटरपर्यंत वाढेल व या वाढीव क्षमतेमुळे शहरातील पाणीपुरवठा चक्रात मोठा बदल होईल. 12 ते 15 दिवसांऐवजी सात दिवसांनी पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
‘अमृत’च्या गोडव्यापर्यंत मिळेल दिलासा
अमृत योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत ही नवीन टाकी तात्पुरता दिलासा ठरेल. लवकरच या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनी दिली. भुसावळकरांच्या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल मंत्री संजय सावकारे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभारही त्यांनी यावेळी मानले. एकूणच, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर मंजुरी मिळाल्याने शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवे बळ मिळेल.
नागरिकांना मिळणार दिलासा : शैलजा नारखेडे
भुसावळ शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत साठवण क्षमता अत्यंत अपुरी होती. ही बाब लक्षात घेऊन आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर नवीन 14 लाख लिटर क्षमतेच्या टाकीस प्रशासकीय मान्यता मिळाली. या कामामुळे शहरातील पाणीपुरवठा अधिक नियमित होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे म्हणाल्या.
प्रभारी नगराध्यक्षा
नवीन जलकुंभामुळे रोटेशन बदलणार : महिमा नागराणी
सध्याची पाणीपुरवठा यंत्रणा जुनी आणि अपुरी असल्याने नागरिकांना 10-12 दिवसांनी पाणी मिळत होते. नवीन साठवण टाकीमुळे ही परिस्थिती बदलणार आहे. साठवण क्षमता वाढल्याने पाणीपुरवठा सात दिवसांवर आणणे शक्य होईल. आगामी काळात अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, असा विश्वास पाणीपुरवठा समिती सभापती महिमा नागराणी यांनी व्यक्त केला.