भाजपा सरकार घालवण्याची हीच योग्य वेळ : उद्धव ठाकरे कडाडले
मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा
मुंबई (रविवार, 19 जुलै 2026) : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार घालवण्याची आता योग्य वेळ आली आहे. धर्मेंद्र प्रधान तर नकोच मात्र सरकारच बदलायचे आहे. मी नेतृत्व करायला आलो नाही. नेते व्हा सांगायला आलो आहे. ही आग सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे, अशी सडकून टीका उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीत क
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा
दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून प्रकृती खालावल्याने सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या जागी आता दिल्लीच्या आंदोलनस्थळी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. त्यांना दिवसेंदिवस मोठा पाठिंबा मिळत आहे. याच आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईतही माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत एका आंदोलनाचे आयोजन केले. यावेळी वांगचूक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देत ठाकरे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आयोजित या आंदोलनाला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. या आंदोलनस्थळी सोनम वांगचूक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


हे सरकार बदलण्याचा लढा सुरू व्हावा
उद्धव ठाकरे म्हणाले, मी आताच एक पोस्टर पाहिले. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, असे त्यात लिहिले होते. राजीनामा ही शुल्लक गोष्ट आहे. केंद्रातील मोदी सरकार आपल्याला रोजी रोटी देऊ शकत नाही, रोजगार शिक्षण देत नाही. उत्तर देत नाही. हे सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे, असे ठाकरेंनी म्हटले आहे.
नेते व्हा सांगायला आलो
उद्धव ठाकरे म्हणाले, धर्मेंद्र प्रधान नको. सरकारच बदलायचे आहे. मी नेतृत्व करायला आलो नाही. नेते व्हा सांगायला आलो आहे. ही आग सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे. सरकार टिकता कामा नये, या आगीत सरकार भस्म झाले पाहिजे. हा लढा फक्त वांगचुक यांचा नाही. तसेच पुढे ते म्हणाले, सत्ता भ्रष्टांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आंदोलनाला सुरुवात करूया, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
सोनम वांगचुक यांनी या देशाला काय दिले?
सोनम वांगचुक यांचे समर्थनार्थ बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सोनम वांगचुक यांनी या देशाला काय दिले आणि या दळभद्री सरकारने देशाला काय दिले, याचा हिशोब एकदा होऊनच जाऊ दे. बर्फामध्ये देशाचे रक्षण करणार्या आपल्या सैनिकांसाठी वांगचुक यांनी ‘सोलर कॅम्प’ बनवून दिले. लडाखमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असताना त्या ठिकाणी कृत्रिम ‘आइस माउंटेन’ ज्यांनी बनवले, आज त्याच सोनम वांगचुक यांना हे सरकार देशद्रोही आणि चीनचे हस्तक ठरवत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही साधला निशाणा
संघावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, पाकिस्तानबरोबर भारताने चर्चा केली पाहिजे, असे वक्तव्य संघाच्या होसबळे यांनी केले होते आणि त्यावर मोहन भागवत यांनीही संमती दर्शवली होती. जे लोक आपल्या सैनिकांच्या जीवावर उठले आहेत, त्या पाकिस्तानसोबत चर्चेसाठी हे तयार आहेत. पण जो व्यक्ती आपल्या लष्करासाठी आणि देशासाठी अहोरात्र काहीतरी करतोय, त्याच्याशी मात्र हे सरकार चर्चेला तयार नाही. आज जे काही देशामध्ये सुरू आहे, ते संघाच्या कल्पनेतील ’हिंदू राष्ट्र’ आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तुमचा पापाचा कोंबडा लवकरच आरवणार
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, चादरीने तुम्ही जरी वांगचुक यांचे आंदोलन झाकण्याचा प्रयत्न केला, तरी सत्य कधीही लपत नाही. तुमच्या पापांवर आता पांघरूण घालता येणार नाही, तुमचा पापाचा कोंबडा लवकरच आरवणार आहे. मोदी सरकारने हिंमत असेल तर आता निवडणुका जाहीर कराव्यात, आम्ही सर्व ताकदीने लढायला तयार आहोत, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.