शेतकर्‍यांनी नाला बुजविल्याने भुसावळ एमआयडीसीत अतिवृष्टीने शिरले पाणी : उद्योगांचे अतोनात नुकसान

तातडीने उपाययोजना करण्याची उद्योजकांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी


भुसावळ (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : शहरातील सहकारी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) परिसरात नुकत्याच झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी थेट कारखान्यांच्या आवारात शिरल्याने येथील उद्योगांना मोठा आर्थिक व उत्पादकीय फटका बसला आहे.या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि पाणी निचर्‍याची कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्यासाठी ’सहकारी औद्योगिक वसाहत मर्यादित’च्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

उद्योगांवर संकट
भुसावळ एमआयडीसी परिसरात सध्या सुमारे 55 ते 60 छोटे-मोठे उद्योग कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने उत्पादने, स्टील, इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, फॅब्रिकेशन, स्पन पाईप, काँक्रीट इलेक्ट्रिकल पोल, पीव्हीसी पाईप, वायर प्लास्टिक, रसायन, रबर आणि पॅकेजिंग आदी उद्योग आहे. या विविध उद्योगांच्या माध्यमातून परिसरातील हजारो कामगार व त्यांच्या कुटुंबांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे मात्र अचानक आलेल्या या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे कारखान्यांमधील यंत्रसामग्री, कच्चा माल आणि तयार मालाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली असून उद्योजकांसह कामगारांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

अतिक्रमणामुळे पाण्याचा मार्ग बंद!
औद्योगिक वसाहतीमधील मुख्य नाल्यावर झालेले प्रचंड अतिक्रमण हे या पूर परिस्थितीचे मुख्य कारण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पुरेशा क्षमतेचा निचरा मार्ग उपलब्ध नसल्यामुळे पावसाचे पाणी वेगाने वाहून न जाता ते थेट कारखान्यांच्या आवारात आणि शेडमध्ये साचले. यामुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक बसलेल्या फट्यामुळे उद्योजक हतबल झाले आहे. पाण्याचा हा प्रश्न कायम स्वरूपी मिटवावा, अशी मागणी होत आहे.

उद्योजकांच्या प्रमुख मागण्या
एमआयडीसी लगत असलेल्या मुख्य नाल्याची तातडीने साफसफाई करण्यात यावी.नाल्यावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत. भविष्यात पुराचा धोका टाळण्यासाठी कायमस्वरूपी बंदिस्त किंवा क्षमतेनुसार नवीन निचरा व्यवस्था उभारावी. सर्व संबंधित शासकीय विभागांनी समन्वयाने काम करून ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.

लोकप्रतिनिधी, प्रशासनाला साकडे
सहकारी औद्योगिक वसाहत मर्यादितचे अध्यक्ष अजय प्रमोद पटेल यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन सादर करण्यात आले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या निवेदनाच्या प्रती प्रमुख लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठवण्यात आल्या आहेत, आमची समस्या दूर करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !