भुसावळात पोलिसासाठी 30 हजारांची लाच मागणी भोवली : खाजगी पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
भुसावळ (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी खाजगी पंटराच्या माध्यमातून 30 हजारांची लाच मागणी करणार्‍या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याच्या अडचणी वाढल्या तर एसीबीने खाजगी पंटराला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार, 29 रोजी दुपारी करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. अमन सनसोये (भुसावळ तालुका) असे अटकेतील खाजगी पंटराचे नाव आहे तर संशयीत कर्मचार्‍याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

असे आहे लाच प्रकरण
भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत एका कर्मचार्‍याने गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे अमन सनसोये या कर्मचार्‍याच्या माध्यमातून 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला.

अन् पोलीस कर्मचार्‍यावर टळला सापळा
खाजगी पंटर व संशयीत पोलीस कर्मचार्‍यावर लाचेची कारवाई करण्यासाठी जळगाव एसीबीने शहरात ऑगस्ट 2026 मध्ये शिस्तबद्धरित्या सापळा रचल्याची माहिती आहे मात्र या दरम्यान कर्मचार्‍याच्या आईचे निधन झाल्याने त्यावेळी कारवाई टळली तर नंतर कर्मचार्‍यालाही सापळ्याचा संशय आल्याची माहिती आहे. एसीबीकडे लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर त्यांनी मंगळवारी संशयीत अमन सनसोये यास अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तर ज्या कर्मचार्‍याच्या सांगण्यावरून लाच प्रकरण घडले त्याचा एसीबीने आता शोध सुरू केल्याची खास सूत्रांची माहिती आहे.

जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत नगरे व सहकार्‍यांनी भुसावळात केलेल्या कारवाईने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !