नाशिक एसीबीची धुळ्यात मोठी कारवाई : 20 हजारांची लाच घेणार्या ग्राममहसुल अधिकार्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
भुसावळ (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : रेती वाहतूक करण्याच्या मोबदल्यात प्रति वाहनामागे 25 हजारांची मागणी करून 20 हजारांची लाच स्वीकारताना धुळ्यात कुसूंब्यातील ग्राममहसुल अधिकारी मोहित बाबासाहेब वारे याच्यासह खाजगी इसम प्रदीप विश्वास पाटील (कोठळ, ता.धुळे) व खाजगी इसम स्वप्नील रामकृष्ण देसले (वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) यांना नाशिक एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने महसूल वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराचा बांधकाम मटेरियलचा व्यवसाय आहे व त्यांच्याकडील दहा व बाराचाकी वाहनातून दिड महिन्यांपूर्वी पांझरा नदीतील वाळूची अमळनेरात वाहतूक होत असताना खाजगी पंटर प्रदीप पाटील याने कुसूंब तलाठी (अतिरीक्त कारभार कौठळ) मोहित वारे यांचे काम पाहत असल्याचे सांगत आमच्या गावातून रेती वाहून न्यायची असल्यास तुम्हास पास बनवून देईल मात्र त्यासाठी मोहित आप्पा यांना भेटावे लागेल अन्यथा ते तुमच्यावर कारवाई करतील, अशी भीती घातली.
25 हजारांची लाच मागणी
25 सप्टेंबर रोजी तक्रारदाराकडे मोहाडी फाटा कौठळ, ता.धुळे येथे प्रदीप पाटील पुन्हा आला व त्याने पांझरा नदी कौठळ येथून वाळू वाहतूक करायची असल्यास प्रत्येक गाडीमागे 25 हजारांचा हप्ता द्यावा लागेल, असे सांगत यापूर्वी दोन गाड्या भरून नेल्यानंतरही तुम्ही तलाठी आप्पांना न भेटल्याने ते तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत, अशी भीती घातली व तुम्ही त्याप्रमाणे त्यांना भेटून घ्या म्हणत 28 रोजी तक्रारदाराला लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर 20 हजारांची लाच मागणी निष्पन्न झाली.
धुळ्यात स्वीकारली लाच
तक्रारदाराकडून धुळ्यातील गांधी पुतळा परिसरात सोमवार, 28 रोजी आरोपी तलाठ्याने 20 हजारांची लाच दोन्ही खाजगी पंटरांसमक्ष स्वीकारली ही रक्कम स्वप्नील देसले यांच्याकडे देताच सापळा रचून असलेल्या नाशिक एसीबीच्या पथकाने आरोपींना अटक केली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा हंडारे, हवालदार संदीप हांडगे, सुरेश चव्हाण आदींच्या पथकाने यशस्वी केला.
