खांडबार्यातील वरिष्ठ तंत्रज्ञाला एसीबीचा शॉक : दोन हजारांची लाच घेताना अटक
सौर कृषीपंपाच्या फोटो अपलोडसाठी मागितली लाच : लाचखोर हादरले
गणेश वाघ
नंदुरबार (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतातील सौर कृषी पंपासाठी आवश्यक असलेल्या बोअरवेल व लाभार्थीचा फोटो महावितरणच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या कामासाठी अडीच हजारांची रुपयांची लाच मागून तडजोडीअंती दोन हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हा सापळा मंगळवार, 29 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे यशस्वी करण्यात आला. राजेंद्र भामद्या वसावे (40) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), खांडबारा येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराने आपल्या शेतात सौर कृषीपंप मिळण्यासाठी 5 सप्टेंबर 2026 रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर सौर कृषीपंप योजनेच्या प्रक्रियेसाठी शेतातील बोअरवेल तसेच लाभार्थीचा फोटो महावितरणच्या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक होते मात्र हे काम प्रलंबित असल्याने तक्रारदाराने संबंधित अधिकार्याशी संपर्क साधला. या कामासाठी आरोपीने तक्रारदाराकडे अडीच हजार लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मागणीत दोन हजार रुपयावर तडजोड निश्चित झाली.
सापळा रचून आरोपीला पकडले
मंगळवार, 29 सप्टेंबर रोजी खांडबारा येथील खांडबारा ते मेंढीपाडा रस्त्यावर सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी राजेंद्र वसावे यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, हवालदार विजय ठाकरे, हवालदार नरेंद्र पाटील, हवालदार जितेंद्र पाटील, हेमंतकुमार महाले आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.
