85 हजारांच्या लाच मागणी प्रकरणी पाचोर्‍यातील स्टॅम्प वेंडर धुळे एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराच्या नातेवाईकाने ट्रॅप केला लीक मात्र लाच मागणीचा अहवाल येताच कारवाई


धुळे (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : जमिनीवरील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी तब्बल 85 हजारांची लाच मागणी करणार्‍या पाचोरा तालुक्यातील स्टॅम्प वेंडरविरोधात धुळे एसीबीने कारवाई करीत त्याच्या मुसक्या बांधल्या आहेत. समाधान सुभाष पाटील (40, कुर्‍हाड बु.॥, ता.पाचोरा) असे अटकेतील स्टॅम्प वेंडरचे नाव आहे.

विशेष म्हणजे तक्रारदाराच्या काकाने संशयीत समाधान पाटील व कुर्‍हाड खुर्द तलाठी नकुल काळकर यांना ट्रॅप आपल्याची कल्पना दिल्याने ट्रॅप झाला नाही मात्र लाच मागणीचे संभाषण व अहवाल आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी धुळे एसीबीने आरोपी समाधान पाटीलला अटक केली. या प्रकरणात आरोपी वाढण्याची दाट शक्यता आहे.

असे आहे लाच प्रकरण
या प्रकरणातील तक्रारदाराचे आजोबा यांच्या नावावरील मौजे कुर्‍हाडखुर्द, ता.पाचोरा येथील शेतजमिनीच्या 7/12 उतार्‍यावरील इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी तक्रारदाराने कुर्‍हाड खुर्द तलाठी नकुल काळकर भेट घेतली होती. हे काम करून देण्यासाठी तलाठ्याने 80 हजार रुपये लाच मागितली व या कामासाठी स्टॅम्प वेंडर समाधान सुभाष पाटील (40, कुर्‍हाड बु.॥, ता.पाचोरा) यांना भेटल्यानंतरच काम होईल, असे सांगितले. तक्रारदाराने या प्रकरणी धुळे एसीबी गाठत 7 जुलै 2026 रोजी लेखी तक्रार नोंदवली.

85 हजारांची मागणी केल्याचे स्पष्ट
धुळे एसीबीने लाच पडताळणी केल्यानंतर स्टॅम्प वेंडर समाधान पाटील याने 90 हजारांची लाच मागणी करीत 85 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले तर 9 जुलै रोजी तक्रारदाराने कुर्‍हाड खुर्द तलाठी नकुल काळकर यांच्याशी संवाद साधला असता स्टॅम्पवेंडर लाच मागत असल्याची कल्पना दिल्यानंतर तलाठ्याने लाच देण्यासाठी मनाई केली नाही तसेच त्यांच्याशी आपला संबंध नाही, असे सांगून हे काम तहसीलदार साहेबांच्या हातात असल्याचे सांगितले.

नातेवाईकानेच केला ट्रॅप लीक
10 जून 2026 तक्रारदार यांच्या काकाने या प्रकरणातील स्टॅम्प वेंडर व तलाठी यांना ट्रॅपबाबत कल्पना दिल्याने त्यांना संशय आला व स्टॅम्प वेंडर यांनी तक्रारदार यांच्या घरी जावून पैसे देण्याचे आवश्यकता नाही, सदर काम तलाठी यांच्याकडून करून देतो, असे सांगितल्याने एसीबीचा ट्रॅप होवू शकला नाही. मात्र लाच मागणीचा अहवाल येताच गुरुवारी आरोपी स्टॅम्प वेंडरला अटक करण्यात आली तर आणखी या प्रकरणात काहींना अटक होण्याची दाट शक्यता आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलसी उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रितेश चौधरी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !