दाऊदी बोहरा समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू डॉ.मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांचे उद्या सावद्यात आगमन
स्वागतासाठी शहर सज्ज ! धर्मगुरूंच्या आगमन होत असल्याने शहरात उत्साहाला उधाण
दीपक श्रावगे
सावदा (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : दाऊदी बोहरा समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू हिज होलीनेस डॉ.मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांचे सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता सावदा शहरात मंगलमय आगमन होत आहे. धर्मगुरूंच्या या बहुप्रतीक्षित आगमनामुळे सावदा शहरातील दाऊदी बोहरा समाजबांधवांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. संपूर्ण समाजात भक्तिमय वातावरणासह उत्साहाचे नवे चैतन्य निर्माण झाले आहे.
दाऊदी बोहरा समाजाकडून व्यापक तयारी
आपल्या सर्वोच्च धर्मगुरूंच्या स्वागताचा हा अविस्मरणीय क्षण संस्मरणीय करण्यासाठी दाऊदी बोहरा समाजाकडून व्यापक तयारी केली जात आहे. धर्मगुरूंच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वागताची लगबग सुरू आहे. विविध धार्मिक व सामाजिक स्वरूपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या स्वागतासाठी समाजातील प्रत्येक घटक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. आबालवृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे.
घरोघरी आकर्षक सजावट ; स्वागतासाठी समाज एकवटला!
धर्मगुरूंच्या आगमनाचे औचित्य साधून बोहरा समाजातील घरोघरी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. घरांसह परिसरातही स्वागताची तयारी सुरू आहे. संपूर्ण समाजात आनंदोत्सवाचे वातावरण आहे. आपल्या लाडक्या धर्मगुरूंचे दर्शन घडावे आणि त्यांच्या पवित्र सान्निध्याचा लाभ मिळावा, यासाठी समाजबांधव आतुरतेने या क्षणाची प्रतीक्षा करीत आहेत.
सावद्यासाठी ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण !
डॉ.मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांच्या आगमनामुळे सावदा शहराच्या धार्मिक व सामाजिक वातावरणाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. धर्मगुरूंच्या भेटीमुळे समाजबांधवांमध्ये एकात्मता, श्रद्धा आणि आनंदाचे वातावरण अधिक वृद्धिंगत होणार आहे. सोमवारचा दिवस दाऊदी बोहरा समाजासाठी अत्यंत भावनिक, अभिमानाचा आणि अविस्मरणीय ठरणार असून, या मंगलमय आगमनाकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे. धर्मगुरूंच्या स्वागतासाठी सावदा नगरी सज्ज झाली असून, त्यांच्या आगमनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
