मारवड येथील विवाहितेची रुग्णवाहिकेतच प्रसुती
अमळनेर (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : विवाहित तरुणीची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याची घटना गुरुवार, 26 रोजी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास घडली. डॉक्टरांच्या तत्काळ सेवेमुळे विवाहिता सुखरूप प्रसूत झाली असून नवजात अर्भकाची प्रकृती उत्तम आहे. मारवड येथील महिला पूजा दीपक भील (26) हिची प्रसूतीची वेळ आली होती. तिला वेदना होऊ लागताच रुग्णवाहिकेला कॉल आला. तत्काळ पायलट शीतलकुमार शिरसाठ आणि डॉ.अवेस शेख घटनास्थळकडे रवाना झाले. रुग्णाला घेऊन ग्रामीण रुग्णालयाकडे नेत असताना महिलेला अधिकच प्रसुती कळा जाणवू लागल्या. डॉक्टरानी महिलेला योग्य ती रुग्णसेवा दिल्या व विवाहिता रस्त्यातच रुग्णवाहिकेतच प्रसूत झाली. वजन तीन किलोवर असल्याचे सांगण्यात आले.
