घरात आलेल्या शाळेला समृद्ध करण्याचं ऑनलाईन आव्हान !
बालभारतीचे सदस्य डॉ.जगदीश पाटील यांचे मत : द्वारकाई व्याख्यानामालेला सुरूवात
भुसावळ : कोरोनाने अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन कौशल्याचे तंत्रच बदलवून टाकले आहे. अर्थात, ऑनलाईन शिक्षणाचे माध्यम वापरणे गरजेचे बनल्याने शाळाच घरात आली आहे पण या घरातल्या शाळेला समृद्ध करण्यासाठी ऑनलाईन साक्षरतेचं मोठं आव्हान शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसमोर उभं ठाकलं आहे, असे मत बालभारतीचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी व्यक्त केले.
भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री स्व.द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यात बुधवारी ‘शाळा आली घरात’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना डॉ. जगदीश पाटील हे बोलत होते. झूम अॅपवर त्यांचे हे व्याख्यान झाले.
कोरोनात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय
प्रास्ताविक फाउंडेशनचेे समन्वयक अरुण मांडळकर, उपक्रमाचा उद्देश माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, सूत्रसंचालन सल्लागार गणेश फेगडे यांनी केले. डॉ. पाटील यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे व्याख्यानाच्या विषयाची मांडणी केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शाळा कधी सुरू होतील हे काही सांगता येत नाही. मात्र या परीस्थितीला तोंड देण्यासाठी सध्या तरी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उभा करण्यात आला आहे. त्यामुळे घराघरातील पालकांची भूमिका बिनीची ठरणार आहे. कोरोनाने स्वत:ची धारणा नष्ट केल्याने कृत्रीम बुद्धीमत्ता आली आहे. कोरोनासोबत जगायला शिकावं लागणार आहे. अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास करून कृतीमालिकांची निर्मिती करावी लागेल. तरच घरात आलेली शाळा समृद्ध होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
ज्ञानाचे भांडार झाले खुले
ऑनलाइन शिक्षण चार प्रकारे घेता येतेे. त्यात शंभर टक्के ऑनलाइन, अंशत: ऑनलाइन, व्हीडीओ, ऑडीओ या प्रकारांचा समावेश करता येईल. क्षमतांचा कस लावणारे हे शिक्षण आहे. पण मोठ्या भावाच्या अभ्यासाचं आकलन लहान भाऊही दृकश्राव्य माध्यमांमुळे करू शकतो. अर्थात, ज्ञानाचं भांडार ऑनलाइन शिक्षणाने खुले केले आहे. पालकांनीही ऑनलाइन साक्षरतेवर भर द्यावा, असे डॉ. पाटील म्हणाले.
पालकांनी पाठ्यपुस्तके हाताळावी
संगणक, मोबाइल क्रांतीमुळे शिक्षण मुठीत आले आहे. एका क्लिकवर हवं ते मिळवता येते. मात्र, असे असले तरी शिक्षण विभागाने पाल्यांना जी पाठ्यक्रमाची पुस्तके पोहोचवली आहेत ती हाताळावी. संवाद, गप्पा, चर्चांच्या माध्यमातून प्रवाही संवाद साधावा. ऑनलाइन शिक्षणाने शिक्षकाचं महत्व कमी होणार नाही. पण आभासी जगाशीही जुळवून घ्यावे लागेल, असे या व्याख्यानातून डॉ. पाटील यांनी नमूद केले.
यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
ऑनलाईन व्याख्यान यशस्वीततेसाठी प्रा.डॉ. गिरीष कोळी, प्रा.निलेश गुरचळ, फाउंडेशन चे अध्यक्ष धिरज धांडे, उपाध्यक्ष राहुल भावसेकर, सचिव तुषार झांबरे व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, गुरुवारी
द्वारकाई व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प जळगाव येथील बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ. जयेंद्र लेकुरवाळे हे गुंफतील. झूम अॅपवर सकाळी 10 वाजता ते ‘बाप माझा सांगाती’ हा विषय मांडतील.

