देवळाली-दानापुर दरम्यान किसान विशेष रेल्वे धावणार!
भुसावळ : मध्य रेल्वे प्रशासनातर्फे शेतकर्यांना त्यांचा माल रेल्वेने बुक करून पाठवण्यासाठी देवळाली-दानापूर दरम्यान किसान विशेष पार्सल रेल्वे गाडी 7 ऑगस्टपासून वेळापत्रकानुसार दर शुक्रवारी चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भुसावळातील रेल्वे प्रशासनोन दिली आहे. या पार्सल गाडीत फळे, भाजीपाला आणि इतर नाशवंत माल बुक करू शकता येईल तसेच ही गाडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे. डाऊन 00107 देवळाली ते दानापूर ही गाडी दर शुक्रवारी, 7 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत देवळाली स्थानकावरून 11 वाजता निघेल आणि शनिवारी दानापूरला 6-45 वाजता पोहोचेल. या गाडीला नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बर्हाणपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, चिवकी, वाराणसी, पंडित दिन दयाळ उपाध्याय नगर आणि बक्सर या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. अप 00108 दानापूर ते देवळाली ही गाडी दर रविवारी9 ते 30 ऑगस्टपर्यंत दानापुर स्थानकावरून 12 वाजता निघेल आणि सोमवारी देवळालीला 7.45 वाजता पोहोचेल. या गाडीला भुसावळ विभागातील बर्हाणपूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड येथे थांबा देण्यात आला आहे.

