सर्व्हिस रोड न करता रस्ता बंद केल्यास तीव्र आंदोलन
नागरीक संतप्त : नही विभागाच्या प्रमुखांना लेखी निवेदनाद्वारे दिला इशारा
भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम प्रगती पथावर असून काही ठिकाणी वापरासाठी रस्ते मोकळे असून काही ठिकाणी तर बंद करण्यात आले आहे. या संदर्भात नहीच्या विभागप्रमुखांशी नागरीकांनी चर्चा करीत सर्व्हिस रोड न करता रस्ता बंद केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
तर दिड किलोमीटरचा फेरा
अयोध्या नगर, सुभाष गॅरेजजवळ सध्या रस्ता खुला असून तो पुढील आठवड्यात बंद करण्यात येईल, असे न्हाईच्या कर्मचार्यांनी नागरीकांना सांगितले. रेल्वे ब्रिज ते नवोदय विद्यालय चौफुली दरम्यान कोणत्याही प्रकारची सुविधा नाही त्यामुळे परीसरात येण्यासाठी दीड किलोमीटरच्या वेढ्याने फिरून यावे लागणार आहे तसेच परीसरातील नागरीकांना ये-जा करणे कठीण होईल. शहरातील अयोध्या नगर, श्रीनगर, भोई नगर, जुना सातारा, मुक्ताई कॉलनी, खळवाडी, रेल दुनिया, गणेश कॉलनी, भिरुड कॉलनी, स्वामी विहार, भुसावळ हायस्कूल परीसरातील नागरीकांसाठी वरणगाव, जामनेरकडे जाण्याची सुविधा बंद होणार असल्याने 20 मार्च 2020 रोजी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, मंगला पाटील, भीमराव पाटील, विशाल ठोके, शंतनू पाथरवट, वर्षा वाडीले, अर्चना चौधरी, सुरेश वैद्य, कुशल पाटील, किशोर पाटील, लव झाडगे, स्वप्नील चौधरी, साहित्य गोयल, भीमराव पाटील, मुकेश कोळी, पवन सोनवणे व नागरीकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जळगाव विभागाचे प्रमुख चंद्रमोहन सिन्हा यांना अयोध्या नगर राष्ट्रीय महामार्ग सहा येथे निवेदन सादर केले होते.
रस्ता बंद केल्यास आंदोलन छेडणार : प्रा.धीरज पाटील
प्रकल्प प्रमुख चंद्रमोहन सिन्हा, टीम लीडर अनिल गर्ग व इतर अधिकार्यांशी वेळोवेळी चर्चा केली, निवेदने दिली. आता अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. या भागातील ज्येष्ठ नागरीक, महिला व हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. परीसरातील नागरीकांच्या सोयीसाठी हा रस्ता बंद करू देणार नाही, रस्ता बंद केल्यास परीसरातील नागरीकांच्या मदतीने तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, असे प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय सावकारे, तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी नागरीकांच्या या समस्येकडे लक्ष केंद्रीत करावे, अशी नागरीकांची मागणी आहे.

