भुसावळात रेल्वे गँगमनचा खून ; आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा
एकेरी बोलल्याचा गैरसमज बेतला तरुणाच्या जीवावर
भुसावळ : आपल्यापेक्षा वयाने लहान असलेला तरुणाने आपल्यास एकेरी बोलल्याने दोघा तरुणांमध्ये झालेल्या वादातून रेल्वे गँगमन असलेल्या तरुणाचा खून झाल्याची माहिती पुढे आली आहे. रात्री उशिरा अटकेतील आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
एकेरी बोलल्याचा गैरसमज बेतला जीवावर
घटनास्थळावरून समजलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी व टॅटू काढून आपली गुजराण करणारा निलेश चंद्रकांत ताकदे (26, जुना सातारा, भुसावळ) हा जामनेर जामनेर रोडवरील हॉटेल खान्देश परमीट रूम अॅण्ड बिअर बारमध्ये शुक्रवारी रात्री मद्य प्राशन करीत असताना काही वेळाने रेल्वेतील गँगमन पिंटू उर्फ विकास वासुदेव साबळे (35, गंगारॉम प्लॉट, भुसावळ) हादेखील मद्य प्राशनासाठी आला, यावेळी निलेशने पिंटू भाऊ, अशी हाक मारली मात्र पिंटू यास आपणास निलेशने एकेरी पिंटू, उच्चे उच्चारल्याचा समज पिंटू यास झाल्याने उभयतांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली. यावेळी निलेशने मयत पिंटूची माफी मागितली व संशयीत घरी गेला मात्र डोक्यात राग असल्याने त्याने मयताला पुन्हा मोबाईलवर फोन करून शिवीगाळ केली व तो पुन्हा हॉटेलमध्ये आला. यावेळी काऊंटरजवळ पिंटू मद्य प्राशन करीत असताना त्याच्याशेजारी निलेशही बसला. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद होवून शाब्दीक चकमक झाली. आरोपी बाथरूममध्ये गेल्यानंतर त्याने पँटमध्ये लपवलेले पेपर कटर काढून पिंटू बेसावध असताना त्याच्या गळ्यावर सपासप तीन वार केल्याने गळ्याच्या नसा फाटून मोठा रक्तस्त्राव होवून पिंटू गारद झाला तर आरोपीने लागलीच तेथून निसटला.
आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा
रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात मयताचे मामा राजू सोपान नेवले यांच्या फिर्यादीनुसार आरोपी निलेश चंद्रकांत ताकदे (25, जुना सातारा, भुसावळ) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेलमध्ये झालेल्या वादातून शिवीगाळ करण्यात आल्याने पिंटूचा खुन करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, संशयीत आरोपी निलेशने यापूर्वी कल्याणला देखील टॅटू काढण्याचे पैसे न दिल्याने एकावर अशाच पद्धत्तीने ब्लेड मारल्याची चर्चा आहे मात्र यास अद्याप अधिकृतरीत्या दुजोरा मिळू शकलेला नाही.