भुसावळ पालिका कर्मचार्यास धमकावल्या प्रकरणी आरोपीस सहा महिन्यांची शिक्षा
भुसावळ सत्र न्यायालयाचा निकाल : पालिका थकबाकी मागताना झाली होती दमदाटी
भुसावळ : नगरपालिकेचे कर अधीक्षक थकबाकी वसुलीसाठी गेल्यानंतर त्यांना संशयीत आरोपी गुरुमिंदरसिंग इंद्रसिंग चाहेल यांनी दमदाटी करीत त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावले होते. या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिसात 28 मार्च 2014 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. या खटल्याप्रकरणी भुसावळ न्यायालयाने संशयीत आरोपीला शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा महिन्यांची साधी कैद तसेच पाच हजार रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास 15 दिवसांची कैद तसेच शस्त्र कायदा कलमाखाली एक महिना कैदेची शिक्षा सुनावली.
पाच वर्ष चालला खटला
कर अधीक्षक प्रकाश एकनाथ कोळी हे सुमारे 10 ते 12 वर्षांपासून असलेल्या थकबाकी वसुलीसाठी चाहेल यांच्याकडे वसुली पथकासह गेल्यानंतर त्यांना हाकलून लावण्यात आले तसेच दुसर्या दिवशी संशयीत आरोपीने पालिकेच्या वसुली कार्यालयात येवून मुख्याधिकारी यांच्याशी अरेरावी केली तसेच फिर्यादी कोळी हे त्यांना समजावण्यास गेले असता त्यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणून कमरेला लावलेले पिस्तूल कोळी यांच्या डोक्याला लावले होते. बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर पाच वर्ष या खटल्याची सुनावणी चालल्यानंतर शनिवाी न्या.आर.आर.भागवत यांनी आरोपीस शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून अॅड.विजय खडसे व संजय डी.सोनवणे यांनी कामकाज पाहिले.