जळगाववरून अखेर मुंबईसाठी विमानाचे ‘टेकऑफ’


जळगाव-मुंबई विमान सेवेला 1 सप्टेंबरपासून सुरुवात

जळगाव : जळगावपासून मुंबई विमान सेवेला लागलेल्या ब्रेकनंतर रविवारपासून विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मुंबई विमान सेवेला रविवार 1 सप्टेंबरपासून पुन्हा सुरुवात झाली. रविवारी सकाळी 58 प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाने मुंबईकडे प्रयाण केले. तत्पूर्वी सकाळी 10.38 वाजता अहमदाबादहून 62 प्रवाशांना घेऊन हे विमान जळगाव विमान तळावर दाखल झाल्यानंतर प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. प्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले आदींची उपस्थिती होती. हैदराबाद येथील ट्रू जेट या कंपनीतर्फे अहमदाबाद ते जळगाव, जळगावहून मुंबई व पुन्हा मुंबईहून कोल्हापूर अशी सेवा दिली जाणार आहे. जळगाव ते अहमदाबादचे तिकीट एक हजार 99 रुपये तर मुंबईचे तिकीट एक हजार 299 रुपये असेल. ट्रू जेटच्या 72 आसनी विमानाद्वारे ही सेवा असेल. मुंबईहून दुपारी 4.30 वाजता विमान निघेल. जळगावला ते सायंकाळी 5.40 वाजता येईल व 6.5 वाजता पुन्हा अहमदाबादला रवाना होईल. दरम्यान, विमानसेवा आता सुरळीत सुरू राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


कॉपी करू नका.